8 ऑगस्ट रोजी मडगावात होणार कार्यक्रम
वार्ताहर /केपे
‘दि केपे अर्बन मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.’ला 8 ऑगस्ट रोजी 30 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने संस्थेने नवीन एफडी योजनेचा शुभारंभ केला आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश शं. वेळीप, उपाध्यक्ष व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, संचालक अलका फळदेसाई, ज्योती वेळीप, सतीश वेळीप, हर्षा रेगे व इतर हजर होते.
जो कोणी 10 हजारांची कायम ठेव ठेवेल त्याला एक कूपन दिले जाईल व त्याचा निकाल 8 ऑगस्ट रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे होणाऱया कार्यकमात काढला जाईल. केपे अर्बनची सुरुवात 1992 मध्ये झाली होती. 352 सभासद घेऊन सुरुवात झाली होती. तीस वर्षांत 304 कोटींच्या ठेवी झाल्या आहेत. 215 कोटींची कर्जे देण्यात आली आहेत. संस्थेच्या 22 शाखा असून 70 हजार भागधारक आहेत. या सर्वांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. गोव्यातच नव्हे, तर संपूर्ण भारतात केपे अर्बनचे नाव झालेले आहे, असे प्रकाश वेळीप यांनी सागितले.
केपे अर्बनची वरील नवीन योजना 8 ऑगस्टपर्यंत चालू राहील. 8 रोजी मडगाव येथे होणाऱया कार्यक्रमास मुख्यमंत्री, सहकारमंत्री व राष्ट्रीय पातळीवरचे नेते उपस्थित राहतील. गोव्यातील नामवंत अशी ही संस्था आहे. 70 हजार भागधारकांनी विश्वास ठेवल्याने संचालक मंडळ सदैव बिनविरोध निवडून आले आहे. केपे अर्बन ही फक्त आपल्या बँकिंग क्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रांतही कार्यरत आहे, असे सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.