वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
फिन ऍलेन आणि कॉनवे यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर येथे सुरू असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत मंगळवारच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानचा नऊ गडय़ांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 130 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 16.1 षटकात 1 बाद 131 धावा जमवित हा सामना 23 चेंडू बाकी ठेवून नऊ गडय़ांनी एकतर्फी जिंकला.
पाकच्या डावामध्ये एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार बाबर आझमने 23 चेंडूत 3 चौकारासह 21, मोहमद रिझवानने 17 चेंडूत 3 चौकारासह 16, शान मसूदने 12 चेंडूत 2 चौकारासह 14, शदाब खानने 1 चौकारासह 8, इफ्तिकार अहमदने 27 चेंडूत 3 चौकारासह 27, असिफ अलीने 20 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 25, हैदर अलीने 8 धावा जमविल्या. पाकच्या डावामध्ये 15 चौकार नेंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदी, सँटनर आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन तर सोधीने एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने 16.1 षटकात 1 बाद 131 धावा जमवित हा सामना आरामात जिंकला. ऍलेन आणि कॉनवे यांनी सलामीच्या गडय़ासाठी 13.3 षटकात 117 धावांची भागीदारी केली. ऍलेनने 42 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकारासह 62 तर कॉनवेने 46 चेंडूत 5 चौकारासह नाबाद 49 आणि कर्णधार विल्यम्सनने 9 चेंडूत नाबाद 9 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 6 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शदाब खानने 26 धावात एक गडी बाद केला.
या तिरंगी मालिकेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी प्रत्येकी तीनपैकी दोन सामने जिंकून बरोबरी साधली आहे. तर या स्पर्धेत भाग घेतलेल्या बांगलादेश संघाला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. न्यूझीलंड संघाचा या मालिकेतील पुढील सामना बांगलादेश बरोबर गुरुवारी खेळविला जात आहे. ख्राईस्टचर्चच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या स्विंग गोलंदाजीवर पाकच्या फलंदाजांना झटपट बाद केले. ‘या सामन्यामध्ये आमच्याकडून खूपच चुका झाल्या असून पुढील सामन्यात आम्ही त्या सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहिन,’ अशी प्रतिक्रिया पाकचा कर्णधार बाबर आझमने या सामन्यानंतर व्यक्त केली.
न्यूझीलंडच्या बेसवेलने 11 धावात 2 गडी बाद केल्याने त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या तिरंगी मालिकेत ब्रेसवेलच्या गोलंदाजीत सातत्य दिसून येत आहे. त्याने गेल्या रविवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 14 धावात दोन गडी बाद केले होते. न्यूझीलंडने हा सामना आठ गडय़ांनी जिंकला होता. मंगळवारच्या सामन्यात बेसवेलने पाकची सलामीची जोडी रिझवान आणि कर्णधार आझम यांना बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः पाक 20 षटकात 7 बाद 130 (इफ्तिकार अहमद 27, असिफ अली नाबाद 25, बाबर आझम 21, रिझवान 16, शान मसूद 14, साऊदी 2-31, सँटेनर 2-27, ब्रेसवेल 2-11, सोधी 1-23), न्यूझीलंड 16.1 षटकात 1 बाद 131 (ऍलेन 62, कॉनवे नाबाद 49, विल्यम्सन नाबाद 9, शदाब खान 1-26).