वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱया वनडे सामन्यात न्यूझीलंडने यजमान विंडीजचा डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे 50 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या दुसऱया सामन्यात पावसाचा अडथळा आला होता. न्यूझीलंडचा ऍलनला सामनावीर घोषित करण्यात आले.
किंग्जस्टन ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडचा डाव 48.2 षटकात 212 धावात आटोपला. विंडीजचा डाव सुरू झाल्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने विंडीजला पंचांनी 41 षटकात विजयासाठी 212 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. पण, न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचा डाव 35.3 षटकात 161 धावांत आटोपला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज ऍलेन 117 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारासह 96 धावा झळकविल्या. मिचेलने 63 चेंडूत 2 षटकार, 2 चौकारासह 41 तर सँटेनरने 27 चेंडूत 1 षटकार, 1 चौकारासह नाबाद 26 त्याचप्रमाणे बोल्टने 2 चौकारासह 16 धावा जमविल्या. विंडीजतर्फे सिंक्लेअरने 41 धावात 4, जेसॉन होल्डरने 24 धावात 3, अकील हुसेनने 51 धावात 2 तर जोसेफने एक गडी बाद केला. न्यूझीलंडच्या डावात 6 षटकार, 13 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजची स्थिती 6 बाद 27 अशी केविलवाणी झाली होती. पावसाचा अडथळा आला आणि खेळ थांबविण्यात आला त्यावेळी विंडीजने 7 बाद 63 धावा जमविल्या होत्या. विंडीजच्या डावात यानिक कॅरेने वनडे क्रिकेटमध्ये आपले पहिले अर्धशतक झळकविले. त्याने 84 चेंडूत 1 षटकार, 2 चौकारासह 52 धावा जमविताना जोसेफसमवेत नवव्या गडय़ासाठी 85 धावांची भागीदारी केली.
जोसेफने 31 चेंडूत 2 षटकार, 5 चौकारासह 49 धावा जमविल्या. शाय हॉपने 1 चौकारासह 16 तर कार्टिकने 1 चौकारासह 16 धावा केल्या. अकिल हुसेनने 1 षटकारासह 11 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 4 षटकार, 9 चौकार नोंदविले गेले. 35.3 षटकात त्यांचा डाव 161 धावात आटोपला. न्यूझीलंडतर्फे साऊदीने 22 धावात 4 तर बोल्टने 18 धावात 3 तसेच सँटेनर आणि फिलिप्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी खेळविण्यात येणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 48.2 षटकात सर्वबाद 212 (ऍलेन 96, मिचेल 41, सँटेनर 26, बोल्ट 16, होल्डर 3-24, सिंक्लेर 4-41, अकिल हुसेन 2-51, जोसेफ 1-47), विंडीज (41 षटकात 212 धावांचे सुधारित उद्दिष्ट) 35.3 षटकात सर्वबाद 161 (कॅरे 51, जोसेफ 49, कार्टिक 16, हॉप 16, साऊदी 4-22, बोल्ट 3-18, सँटेनर 1-21, फिलिप्स 1-34).