कॉनवेचे शतक, लॅथम, ब्लंडेल, हेन्री यांची अर्धशतके, अब्रार अहमदचे 4
वृत्तसंस्था/ कराची
दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत मंगळवारी खेळाच्या दुसऱया दिवशी न्यूझीलंडने आपली पकड अधिक मजबूत करताना पहिल्या डावात 449 धावांचा डोंगर रचला. दिवसअखेर यजमान पाकने पहिल्या डावात 3 बाद 154 धावापर्यंत मजल मारली होती.
दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघ मालिकाविजयासाठी प्रयत्न करीत आहेत. या दुसऱया निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने 6 बाद 309 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे चार गडी 140 धावांची भर घालत तंबूत परतले. 30 धावावर खेळत असलेल्या ब्लंडेलने आपले अर्धशतक पूर्ण केले. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर पाकच्या नसीम शहाने सोधीचा त्रिफळा उडवला. त्याने 2 चौकारासह 11 धावा जमवल्या. ब्लंडेल आठव्या गडय़ाच्या रुपात तंबूत परतला. अब्रार अहमदने त्याचा त्रिफळा उडवला. त्याने 108 चेंडूत सहा चौकारासह 51 धावा झळकवल्या. कर्णधार टीम साऊदी अब्रार अहमदच्या गोलंदाजीवर सर्फराज अहमदकरवी यष्टीचित झाला. त्याने 1 चौकारासह 10 धावा जमवल्या. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 9 बाद 345 अशी होती. त्यानंतर मॅट हेन्री आणि अझाज पटेल या शेवटच्या जोडीने 104 धावांची भागीदारी केल्याने न्यूझीलंडला 449 धावापर्यंत मजल मारता आली. अब्रार अहमदने अझाज पटेलला झेलबाद केले. त्याने 78 चेंडूत 4 चौकारासह 35 धावा केल्या. मॅट हेन्री 2 षटकार आणि 8 चौकारासह 68 धावावर नाबाद राहिला. पाकतर्फे अब्रार अहमदने 149 धावात 4 तर सलमानने 75 धावात 3 तसेच नसीम शहाने 71 धावात 3 गडी बाद केले.
इमाम हकचे नाबाद अर्धशतक
अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांनी पाकच्या डावाला सावध सुरुवात करताना 27 धावांची भागीदारी केली. डावातील आठव्या षटकात हेन्रीने शफीकला झेलबाद केले. त्याने 4 चौकारासह 19 धावा जमवल्या. नंतर अझाज पटेलने शान मसूदला झेलबाद केले. त्याने 4 चौकारासह 20 धावा केल्या. कर्णधार बाबर आझम आणि इमाम उल हक या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 43 धावांची भर घातली. एकेरी धाव घेण्याच्या नादात कर्णधार बाबर आझम धावचीत झाला. त्याने 1 षटकार आणि 3 चौकारासह 24 धावा जमवल्या. पाकने दिवसअखेर 47 षटकात 3 बाद 154 धावा जमवल्या. अद्याप ते 295 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सात गडी खेळावयाचे आहेत. न्यूझीलंडतर्फे हेन्री आणि पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफकल ः न्यूझीलंड प. डाव 131 षटकात सर्व बाद 449 (कॉनवे 122, लॅथम 71, विल्यम्सन 36, निकोल्स 26, ब्लंडेल 51, सोधी 11, साऊदी 10, हेन्री नाबाद 68, अझाज पटेल 35, अब्रार अहमद 4-149, सलमान 3-75, नसीम शहा 3-71), पाक प. डाव 47 षटकात 3 बाद 154 (इमाम उल हक खेळत आहे 74, शफीक 19, शान मसूद 20, बाबर आझम 24, शकील खेळत आहे 13, हेन्री 1-35, अझाज पटेल 1-30).