वृत्तसंस्था/ लाहोर
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ येत्या डिसेंबर महिन्यात पाकच्या दौऱयावर येणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघात वनडे, टी-20 आणि कसोटी मालिका खेळविल्या जाणार आहेत. न्यूझीलंड संघाचा पाकचा हा दौरा दोन टप्प्यात राहील.
पाक क्रिकेट मंडळाने सोमवारी न्यूझीलंड संघाच्या या आगामी दौऱयाची माहिती दिली. या दौऱयामध्ये उभय संघात पाच वनडे, पाच टी-20 आणि दोन कसोटी सामने आयोजित केले आहेत. उभय संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत राहील. ही कसोटी मालिका 27 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान खेळविली जाईल. कसोटी मालिका झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ मायदेशी रवाना होईल. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ पुन्हा एप्रिल महिन्यात पाकच्या दौऱयावर येणार आहे. या दौऱयातील न्यूझीलंडचा हा दुसरा टप्पा राहील.
न्यूझीलंडचा संघ आपल्या पाकच्या पहिल्या टप्प्यातील दौऱयात 2 कसोटी सामने खेळणार आहे. उभय संघातील पहिली कसोटी कराचीत 27 ते 31 डिसेंबर तर दुसरी कसोटी 4 ते 8 जानेवारी दरम्यान मुल्तान येथे होणार आहे. या कसोटी मालिकेनंतर न्यूझीलंडचा संघ आयसीसी वर्ल्ड कप सुपरलीग स्पर्धेतील तीन सामने खेळण्यासाठी कराचीत पुनरागमन करेल. हे तीन सामने 11, 13 आणि 15 जानेवारीला होणार आहेत. पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील कराचीमधील पहिली कसोटी 1990 नंतर पहिल्यांदाच खेळविली जात आहे. 1990 मध्ये येथे झालेल्या या कसोटीत पाकचे माजी वेगवान गोलंदाज वासीम अक्रम आणि वकार युनुस यांनी 15 गडी बाद केले होते. तर शोएब मोहम्मदने नाबाद द्विशतक (203) झळकविले होते. 2002 च्या मे महिन्यात पाक आणि विंडीज यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका खेळविली गेली.
न्यूझीलंडचा संघ आपल्या पाक दौऱयाच्या दुसऱया टप्प्याला 13 एप्रिलपासून प्रारंभ करणार आहे. न्यूझीलंड आणि पाक यांच्यात कराचीत 13, 15, 16 आणि 19 एप्रिलला चार टी-20 सामने होणार आहेत. त्यानंतर उभय संघातील पाचवा टी-20 सामना लाहोरमध्ये 23 एप्रिलला खेळविला जाईल. पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिले दोन वनडे सामने 26 आणि 28 एप्रिलला लाहोरमध्ये आयोजित केले आहेत. त्यानंतर शेवटचे तीन वनडे सामने 1, 4, 7 मे रोजी रावळपिंडीत खेळविले जातील, अशी माहिती पीसीबीचे संचालक झकीर खान यांनी दिली आहे.
2022 च्या क्रिकेट हंगामात पाकचा दौरा करणारा न्यूझीलंडचा तिसरा संघ आहे. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा पाकचा दौरा 24 वर्षांनंतर केला होता. या दौऱयात त्यांनी तीन कसोटी, तीन वनडे आणि एकमेव टी-20 सामना खेळला होता. या दौऱयानंतर इंग्लंड संघाने तब्बल 17 वर्षानंतर पाकचा दौरा केला. या दौऱयामध्ये उभय संघात 7 टी-20 सामन्यांची मालिका खेळविली गेली. आता इंग्लंडचा संघ नोव्हेंबर अखेरीस पुन्हा पाकच्या दौऱयावर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल होणार आहे. उभय संघातील या कसोटी रावळपिंडी, मुल्तान आणि कराची येथे खेळविल्या जातील.