वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज 35 वर्षीय हमीश बेनेटने 2021-22 च्या क्रिकेट हंगामाअखेर क्रिकेटच्या सर्वप्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.
बेनेटने आपल्या वैयक्तिक 17 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला निरोप देण्याचे निश्चित केले आहे. न्यूझीलंडच्या 19 वर्षांखालील युवा संघाचे त्याने प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर त्याने न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघात स्थान मिळविले. न्यूझीलंडमधील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो वेलिंग्टन आणि कँटरबरी संघांचे प्रतिनिधीत्व करत होता. या दोन्ही संघांकडून त्याने 265 सामन्यांत क्रिकेटच्या विविध प्रकारात 489 गडी बाद केले.
2010 साली बेनेटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात पदार्पण केले. त्यानंतर महिन्याच्या अंतराने त्याने भारताविरूद्ध अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात कसोटीत पदार्पण केले होते. बेनेटने क्रिकेटच्या विविध प्रकारात 31 सामन्यांत न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व करताना 43 बळी मिळविले आहेत. 2011 साली भारतात झालेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याची न्यूझीलंड संघात निवड झाली होती.