वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंड आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 8 गडय़ांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात न्यूझीलंडची गोलंदाज जेस केरने 4 गडी बाद केले. तर सुझी बेटस् (नाबाद 93) आणि आणि मॅडी ग्रीन (नाबाद 59) यांनी अर्धशतके झळकविली.
या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 180 धावा जमवल्या. त्यानंतर न्यूझीलंडने दोन गडय़ांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या 6 षटकात दोन गडी गमावताना केवळ 10 धावा जमवल्या होत्या. न्यूझीलंडच्या केरने दोन बळी मिळवले. त्यानंतर शर्मिन अख्तर आणि कर्णधार निगार सुलताना यांनी तिसऱया गडय़ासाठी 64 धावांची भागीदारी केली. नंतर सुलतानाने लता मोंडलसमवेत 55 धावांची भर घातली. सुलतानाने 1 षटकार आणि 3 चौकारासह 73 धावा जमवल्या. न्यूझीलंडच्या जेस केरने 23 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावाला सुरुवातीलाच बांगलादेशच्या जहानआरा आलमने आपल्या दोन चेंडूवर 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर बेटस्ने कर्णधार डिव्हाईन समवेत पहिल्या गडय़ासाठी 50 धावांची भागीदारी केली. डिव्हाईनने 21 धावा जमवल्या. ऍमेलिया केर खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचित झाली. त्यानंतर बेटस् आणि ग्रीन यांनी तिसऱया गडय़ासाठी 134 चेंडूत अभेद्य 131 धावांची अभेद्य भागीदारी करून आपल्या संघाला 114 चेंडू बाकी ठेवून आठ गडय़ांनी विजय मिळवून दिला. ग्रीनने 5 चौकारासह 70 चेंडूत नाबाद 59 तर बेटस्ने 91 चेंडूत 12 चौकारासह नाबाद 93 धावा झळकविल्या.