वृत्तसंस्था/ कराची
यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याला येथे शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये नवोदित युवा फिरकी गोलंदाज रेहान अहमदला संधी देण्यात आली आहे. इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये स्थान मिळविणारा रेहान अहमद हा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू ठरला आहे.
या कसोटी मालिकेत इंग्लंडने पाकवर 2-0 अशी विजयी आघाडी यापूर्वी मिळविली आहे. पाकचा संघ या सामन्यात व्हाईटवॉश टाळण्यासाठी प्रयत्नशील राहिल. इंग्लंड संघामध्ये स्थान मिळविणारा फिरकी गोलंदाज रेहान अहमद याचे वय 18 वर्षे, 126 दिवस आहे. यापूर्वी इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट इतिहासामध्ये ब्रायन क्लोजने 18 वर्षे 149 दिवस वय असताना कसोटी पदार्पण केले होते. क्लोजचा हा विक्रम रेहान अहमदने मागे टाकला आहे.
या शेवटच्या कसोटीसाठी कर्णधार स्टोक्सने आपल्या संघात दोन बदल केल्याचे सांगितले. जॅक्सच्या जागी रेहान अहमद तसेच अँडरसनच्या जागी यष्टीरक्षक फोक्स याना संधी देण्यात आली आहे. इंग्लंडने मुल्तानची दुसरी कसोटी 26 धावांनी जिंकून हि मालिका सिलबंद केली आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अधिक अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याचे इंग्लंडने फिरकी गोलंदाजाचा समावेश केला आहे. 2005 नंतर प्रथमच इंग्लंडचा संघ पाकमध्ये कसोटी मालिका खेळत आहे.