Tarun Bharat

मनपातील 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

कोल्हापूर : विनोद सावंत

तीन वर्षापेक्षा जास्त दिवस एकाच विभागात ठाण मांडून असणाऱ्य़ा कर्मचाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावाला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मान्यता दिली आहे. महिन्या अखेरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्ग एक ते चारमधील सुमारे 600 कर्मचाऱ्यांच्या यामध्ये समावेश आहे.

कोल्हापूर महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या तीन वर्षानंतर बदली करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, काही कर्मचारी एकाच विभागात अनेक वर्षापासून ठाण मांडून आहेत. येथील कर्मचाऱ्यांच्या बदलीचा विषय वारंवार चर्चेत राहतो. पक्ष, संघटनेतून बदल्याची मागणी जोर धरते. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही बदलीचा प्रस्ताव तयार करून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे दिला होता. प्रशासक डॉ. बलकवडे यांनी या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात वर्ग एक ते वर्ग चार मधील सुमारे 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

चहा पेक्षा किटली गरम
वर्ग चारमधील झाडू कामगार, सफाई कर्मचारी, शिपाई, मुकादम, पवडी कामगार हे 20 वर्षापासून एकाच ठिकाणी काम करत आहेत. बदली झाली नसल्यामुळे त्यांची मक्तेदारी झाली आहे. काही कर्मचारी आरेरावी करतात. चहा पेक्षा किटली गरम अशी स्थिती झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांसोबत आरोग्य निरिक्षकांच्याही बदल्या होणे आवश्यक आहेत.

केबिनमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केव्हा?
सभागृह अस्तित्वात नसल्याने महापौर, उपमहापौर अशा पदाधिकाऱ्यांच्या केबिनमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमधील कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून आहेत. तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यांची बदली होताच ताकद वापरून पुन्हा ते मुळ ठिकाणी आले.

पदोन्नतीच्या बदल्यांना ब्रेक
पदोन्नतीची यादी प्रसिद्ध झाली आहे. पाच वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर बदल्या काही कारणामुळे स्थगित झाल्या. यानंतर ही प्रक्रिया थांबली आहे. वास्तविक पदोन्नतीच्या बदल्यांना प्रथम प्राधान्य देणे आवश्यक होते. कर्मचारी संघानेही तशी मागणी केली होती.

23 मे रोजी समुपदेशन पद्धतीने होणार बदली
तत्कालिन आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी 2017 मध्ये समुपदेशन पद्धतीने बदल्या केल्या होत्या. त्याच धर्तीवर 23 मे रोजी समुपदेशन पद्धतीने बदल्या होणार आहेत. यामध्ये स्क्रिनवर रिक्त जाग आणि विभागाची माहिती दिली जाणार असून यामध्ये कर्मचाऱ्यांना पसंतीनुसार विभाग निवडता येणार आहे.

तीन वर्षापेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्यां वर्ग एक ते वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या प्रस्तावास प्रशासकांनी मान्यता दिली आहे. यामधील पात्र कर्मचाऱ्यांची यादी करण्याचे काम सुरू असून ती प्रसिद्ध केली जाणार आहे. यावर हरकती घेतल्या जाणार असून महिन्या अखेरीस बदल्या होतील.
सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी, कोल्हापूर महापालिका

Related Stories

टेक्निकल टेक्स्टाईलसाठी योजना वस्त्रोद्योगाच्या भवितव्यासाठी स्वागतार्ह : हाळवणकर

Archana Banage

कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहतीत तरुण उद्योजकाची आत्महत्या

Archana Banage

पेठ वडगाव परिसरात खासगी डॉक्टरांचे दवाखाने बंद, प्रशासनाचेही दुर्लक्ष

Archana Banage

जिल्ह्यातील ९०० गावांच्या विकासासाठी एनडीएसोबत, खासदार संजय मंडलिक यांची भूमिका, तर माने कोल्हापुरात येऊन बोलणार

Rahul Gadkar

पाळीव प्राण्यांचा क्लोन तयार करतेय कंपनी

Patil_p

ब्रिटनचे व्हिसाशुल्क वाढले, भारतीयांवर पडणार प्रभाव

tarunbharat