ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. बंदी घातलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेविरुद्ध दाखल प्रकरणात NIA ने आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या 14 जिल्ह्यातील 45 ठिकाणांवर छापे टाकले. जम्मू पोलीस आणि CRPF च्या मदतीने ही कारवाई सुरू आहे.
श्रीनगरमध्ये नौगाम येथील सौरा रहिवासी गाझी मोईन-उल-इस्लाम आणि फलाह-ए-आम यांच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आले. अनंतनाग जिल्ह्यात गुलाम हसन वानी, गुलाम रसूल रैना, मोहम्मद याकूब खान, अफतक अहमद मीर आणि अहमदउल्ला पारे यांच्या लपण्याच्या ठिकाणीही छापे टाकले.
बडगाम जिल्ह्यात सोईबुग येथील डॉ. मोहम्मद सुलतान भट, गुलाम मोहम्मद वानी आणि गुलझार अहमद शाह यांच्यासह अनेक नेत्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात येत आहेत. बांदिपोरा येथील जमातच्या माजी अध्यक्षांच्या निवासस्थानाची झडती घेतली जात आहे. त्याचप्रमाणे गांदरबल, शोपियान, कुलगाम, बारामुल्ला, पुलवामा, रामबन, दोडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामी संघटनेवर 2019 मध्ये पाच वर्षांची बंदी घातली होती.