वृत्तसंस्था / हैदराबाद
राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘एनआयए’ने 16 मार्च रोजी प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरूद्ध (पीएफआय) आणखी एक आरोपपत्र दाखल केले आहे. तपास यंत्रणेने हैदराबाद येथील विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. शेख रहीम उर्फ अब्दुल रहीम, शेख वाहिद अली उर्फ अब्दुल वाहीद अली, जफरउल्ला खान पठाण, शेख रियाझ अहमद आणि अब्दुल वारीस अशी आरोपपत्रातील पाच आरोपींची नावे आहेत. यापूर्वी, ऑगस्ट 2022 मध्ये तेलंगणा पोलिसांकडून तपास हाती घेतल्यानंतर एनआयएने डिसेंबर 2022 मध्ये या प्रकरणातील 11 आरोपींविरूद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले होते. तेलंगणा पोलिसांनी गेल्यावषी 4 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता.
पीएफआय नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रभावशाली मुस्लीम तरूणांना दहशतवादी आणि हिंसाचाराचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची भरती केली. त्यांना शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर आयोजित केल्याचे हैदराबादमधील विशेष एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे. त्यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 120बी, 153ए आणि युएपीए 1963 च्या कलम 13(1)(बी), 18, 18ए आणि 18बी अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरापासून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या देखरेखीखाली पीएफआयवर कारवाई सुरू आहे. विशेषत: दक्षिणेतील आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये ही कारवाई गतीने सुरू आहे. त्याबरोबरच जम्मू काश्मीर, पंजाब, मध्यप्रदेश या राज्यांमध्येही पीएफआयचे हस्तक तपास यंत्रणांच्या हिटलिस्टवर आहेत.