ऑनलाईन टीम/तरुण भारत
दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) आज पुन्हा ‘पोप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (Popular Front Of India- PFI) ठिकाणांवर छापेमारी करण्यात येत आहे. तपास यंत्रणांनी छापेमारीची दुसरी फेरी सुरु केली आहे. एनआयए आणि इतर तपास यंत्रणांकडून या कट्टरपंथी संघटनेविरोधात कारवाई करण्यात येत आहे. तपास यंत्रणांकडून देशातील आठ राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. कर्नाटकमधून (Karnataka) पीएफआयच्या ४५ सदस्यांना यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. या सदस्यांना स्थानिक तहसीलदारांपुढे हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. पुण्यातूनही पोलिसांनी पीएफआयच्या सहा समर्थकांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ राज्यांमध्ये २५ ठिकाणी पुन्हा छापेमारी केली आहे. पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आलेत. तसेच अनेक पीएफआय सदस्यांना ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूरमधूनही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front Of India- PFI) कार्यकर्त्यांना एटीएस आणि एनआयएने ताब्यात घेतले आहे. तर ठाण्यातून ४ आणि कल्याण, भिवंडीतून प्रत्येकी १- १ कार्यकर्त्याला ताब्यात घेतल आहे.
तसेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरुन मिरज येथील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित व्यक्तीची चौकशी सुरु झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरो युनिट (आय.बी) सांगली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. त्याच्या राहत्या घरातून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
हे ही वाचा : जामीन अर्जावर आठवड्याभरात निर्णय देण्याचे सर्वोच्च न्यायालया आदेश; देशमुखांना दिलासा
काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या देशभरातील कार्यलयांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी जवळपास १०० हुन अधिक जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातही काल एनआयए आणि एटीएसकडून संयुक्त कारवाई केली. सोमवारी मध्यरात्रीपासून तपास यंत्रणा ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.