चंदीगढ / वृत्तसंस्था
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील 15 ठिकाणी छापे टाकले. पाकिस्तानी हस्तकांशी संबंध असल्याचा संशय असलेल्या डझनभर लोकांच्या संशयित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. जून 2022 मध्ये एनआयएने स्वत: ओव्हरग्राउंड कामगार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविऊद्ध गुन्हा नोंदवला. ते पाकिस्तानी कमांडर किंवा हँडलरच्या आदेशानुसार गुप्त नावाने काम करत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर छापेमारी हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी एनआयएच्या पथकांनी शनिवारी (11 मार्च) मध्यप्रदेशातील सिवनी येथे चार ठिकाणी छापेमारी केली होती. एनआयएच्या दिल्ली मुख्यालयात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सिवनी जिह्यात संशयास्पद आणि बेकायदेशीर हालचालींची माहिती मिळाल्यावर एनआयएचे पथक तपासासाठी सिवनी भागात पोहोचले होते. त्यानंतर दोन दिवस येथे तपासकाम हाती घेण्यात आले होते. तपासादरम्यान एनआयएच्या अधिकाऱ्यांनी इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत प्रकरणातील संशयित तलहा खान आणि अक्रम खान यांच्या घरांची झडती घेतली.
एनआयएचे पथक बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) कलमांव्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या कलम 121, 121 ए अंतर्गत दिल्लीत दाखल झालेल्या प्रकरणाची चौकशी करत आहे. एनआयएने पुणे, शिमोगा आदी ठिकाणीही तपासकार्य हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या तपासाबाबत पूर्णपणे गोपनीयता पाळली जात आहे. ज्या ठिकाणांची झडती घेण्यात आली त्यात संशयित अब्दुल अजीज सल्फी आणि शोएब खान यांच्या निवासी आणि व्यावसायिक जागेचा समावेश आहे. अटकेतील संशयित दहशतवाद्यांच्या जबानीतून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे गेल्या आठवड्यापासून एनआयएकडून कसून तपास आणि शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.