ख्रिसमस, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बेंगळूरला लक्ष्य बनविण्यात येण्याची शक्यता गृहीत धरून एनआयएने बुधवारी शहरात विविध ठिकाणी छापेमारी केली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी एकूण सहा ठिकाणी धाडी टाकल्या असून कसून चौकशी सुरू केली आहे.
दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी यापूर्वी मुदासिर, जाहीद आणि तबरेज यांना एनआयएने अटक केली होती. हेब्बा पोलीस स्थानक हद्दीतील सुलतानपाळ्या येथे सीसीबी पोलिसांनी 1 जुलै रोजी छापा टाकला होता. नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले. एनआयएने नंतर विविध ठिकाणी धाडी टाकून 7 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे, हॅन्डग्रेनेड आणि वॉकीटॉकी जप्त केले होते. जुनैद नामक व्यक्ती विदेशातून सुत्रे सांभाळत असल्याचे चौकशीतून पुढे आल्यानंतर एनआयएने गुप्तचर यंत्रणेमार्फत त्याच्या कारवायांवर लक्ष ठेवले आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संशयितांच्या निवासस्थानांवर छापे टाकून झडती घेण्यात आली आहे.