वकिलासह 13 जण ताब्यात : बांगलादेशींचा समावेश
वृत्तसंस्था/ जबलपूर
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री जबलपूरमध्ये छापे टाकले. या टीमने मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ए. के. उस्मानी यांना ताब्यात घेण्यात आले. एनआयएच्या पथकाने रात्री उशिरा ओमटी येथील घंटाघर येथील त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला. सिव्हिल लाईन परिसरातील सुप्रीम प्लाझा अपार्टमेंटमधून दोघांना ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे. कारवाई केलेल्यांमध्ये 6 बांगलादेशी नागरिक असून त्यांनी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करत भारतातील आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट ओळखपत्रेही मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
जमात-उल-मुजाहिदीन, बांगलादेशला (जेएमबी) विदेशी शस्त्रास्त्रे आणि दहशतवादी फंडिंग संदर्भात हा छापा टाकण्यात आला होता. भोपाळसह इतर शहरांतून अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या पोलीस चौकशीत यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईअंती एनआयएच्या पथकाने उस्मानीसह 13 जणांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली.
एनआयएने शहरातील सिव्हिल लाईनमध्ये दोन ठिकाणी, बडी ओमटी आणि आधारताल येथे दोन ठिकाणी शुक्रवारी रात्री उशिराने कारवाई केली. एनआयएने सिव्हिल लाईन परिसरातील सुप्रीम प्लाझा अपार्टमेंटवरही छापा टाकला. येथे राहणारे वकील नईम यांना नोटीस देऊन भोपाळला बोलावण्यात आले आहे. एनआयएने मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद बिलाल या दोन भावांना ओमाती परिसरातून ताब्यात घेतले. यापूर्वी बांगलादेशच्या जमात-उल-मुजाहिदीन, बांगलादेश (जेएमबी) या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित भोपाळ दहशतवादी निधी प्रकरणाच्या संदर्भात एनआयएने 25 मे रोजी उत्तर प्रदेशात दोन ठिकाणी छापे टाकले होते.