दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई
श्रीनगर / वृत्तसंस्था
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी सकाळी चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांमध्ये छापे टाकले. एनआयए पथकाने येथून डिजिटल उपकरणे, सिमकार्ड, लॅपटॉपसह अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. या प्रकरणांतील काही संशयितांच्या निवासांवर आणि छुप्या ठिकाणांवर गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू आहे. एनआयएने शुक्रवारीही दहशतवादी फंडिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये 14 ठिकाणी छापेमारी केली होती. कुलगाम, पुलवामा, अनंतनाग, सोपोर आणि जम्मू जिह्यांमध्ये एकाचवेळी कारवाई करण्यात आली होती.
जम्मूमधील एनआयएच्या पथकाने प्रेम नगर ख्रिश्चन कॉलनी, पीर मिठा येथे छापे टाकले. याप्रसंगी कुलगामचा रहिवासी किफायत अहमद इत्तू याला येथून अटक करण्यात आली. पथकाने त्याच्या घरातून मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. दुसरीकडे, काश्मीरमध्ये राज्य तपास यंत्रणेकडून (एसआयए) कारवाई करण्यात आली. या अंतर्गत श्रीनगरच्या जिल्हाधिकाऱयांनी काही काळापूर्वी जमात-ए-इस्लामीच्या तीन मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यात फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या घराचाही समावेश होता. त्यानुसार गिलानी यांचे श्रीनगरमधील बारजुल्ला येथील घर आज सील करण्यात आले.