तहसीलदार प्रवीण जैन यांना निवेदन : नागरिकांची कागदोपत्री होतेय अडचण
वार्ताहर /खानापूर
निडगल येथील अनेक नागरिक सन्नहोसूर गावच्या सर्व्हे नंबर विभागात घरे बांधून वास्तव्यास आहेत व बरगाव ग्राम पंचायतीमध्ये सदर घरांची निडगल म्हणून नोंदही आहे. पण ग्राम पंचायतीच्या पंचतंत्रमध्ये सदर विस्तारित घरांचे कागदपत्र तोपिनकट्टी ग्राम पंचायतीच्या पंचतंत्रमध्ये येत असल्याने निडगल गावातील विस्तारित भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कागदोपत्री मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासाठी निडगल गावच्या गावठाणची सरहद्द निश्चित करून सन्नहोसूर भागातील विस्थापित घरांचा निडगल ग्राम पंचायतीमध्ये समावेश करावा, अशी मागणी करणारे निवेदन निडगल गाव पंच कमिटीच्या वतीने तहसीलदार यांच्यासह विविध खात्याच्या अधिकाऱयांना शुक्रवारी देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, निडगल गावातील अनेक नागरिक सन्नहोसूर गावच्या आठ ते दहा सर्व्हे नंबरमध्ये घरे बांधून वास्तव्यास आहेत. तर काही लोक सिंगीनकोप गावच्या एका सर्व्हे नंबरमध्ये घरे बांधून वास्तव्यास आहेत. सदर घरे बरगाव ग्राम पंचायतीमध्ये गेल्या तीस वर्षापासून नोंद आहेत. या सर्व भागाचा अधिकार निडगल गावाशी संबंधित आहे. पण पंचतंत्रमध्ये सदर भाग सन्नहोसूर गावच्या हद्दीत येत असल्याने तोपिनकट्टी ग्राम पंचायतीशी जोडण्यात आल्याने येथील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासाठी या भागाचा सर्व्हे करून सर्व्हे नंबरमधील विस्थापित भाग निडगल गावच्या गावठाण हद्दीत समाविष्ट करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, जि. पं. कार्यकारी अधिकारी, तालुका पंचायत खानापूर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
सदर निवेदन देताना पंच कमिटीचे गणपती पाटील, रावसाहेब पाटील, परशराम कदम, रोहित पाटील, महादेव कदम, प्रकाश सुतार, नंदू पाटील, कल्लाप्पा कांबळे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.