वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या निखत झरीन आणि मनीषा मौन यांनी आपल्या वजन गटातून उपउपांत्य फेरी गाठली आहे.
रविवारी या स्पर्धेतील झालेल्या लढतीत भारताची अव्वल महिला मुष्टीयोद्धी निखत झरीनने आपल्या जबरदस्त ठोशाच्या जोरावर अल्जेरियाच्या बॉलेम रोमास्याचा पराभव करत उपउपांत्य फेरीत स्थान मिळवले. निखतने हा विजय 5-0 अशा गुणफरकाने जिंकला. या स्पर्धेतील झरीनचा हा सलग दुसरा विजय आहे. निखतने या स्पर्धेत विद्यमान आफ्रिकन विजेतीला पराभवाची धूळ चारली. निखत झरीनने गेल्या महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.
महिलांच्या 57 किलो वजन गटात भारताच्या मनीषा मौनने ऑस्ट्रेलियाच्या रहीमी टिनाचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत उपउपांत्यपूर्व म्हणजे शेवटच्या स्पर्धकात स्थान मिळवले आहे. मनीषा मौनने गेल्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियन स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते.