वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
आगामी होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला मुष्टियोद्धे निखत झरीन आणि लोव्हलिना बोर्गोहेन यांनी आपली तिकीटे आरक्षित केली आहेत.
28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी येथे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. विद्यमान विश्वविजेती तसेच दोनवेळा स्ट्रेंजा स्मृती मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी निखत झरिनने निवड चाचणी स्पर्धेत हरियाणाच्या मिनाक्षीचा 7-0 असा एकतर्फी पराभव करत राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. या स्पर्धेत निखत झरिन 50 किलो वजनगटात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
महिलांच्या 70 किलो वजनगटात टोकियो ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेनने येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये रेल्वेच्या पूजाचा 7-0 अशा गुणांनी पराभव करत राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.
प्रत्येक चार वर्षांनीं होणाऱया राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय महिला मुष्टीयुद्ध संघामध्ये 48 किलो गटात नितू, 60 कि. वजनगटात जास्मिन यांचा समावेश आहे. हरियाणाच्या निखत झरिनला यंदाचे वर्ष बरेच यशदायी ठरत आले आहे. चालू वर्षीच्या प्रारंभी झालेल्या स्ट्रेंजा स्मृती मुष्टियुद्ध स्पर्धेत निखत झरिनने सुवर्णपदक पटकाविले होते.
2021 आशियाई युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्य पदक मिळविणाऱया जास्मिनने 60 किलो वजनगटात 2022 विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्य पदक मिळविणाऱया परवीन हुडाचा पराभव केला. या निवड चाचणी स्पर्धेत नितूने 48 किलो वजनगटात राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले.
भारताची 39 वर्षीय महिला मुष्टियोद्धा तसेच सहावेळा विश्वविजेतेपद मिळविणारी एमसी मेरी कॉमला गुडघ्याला दुखापत झाल्याने तिने शुक्रवारी निवड चाचणी स्पर्धेतून माघार घेतली. मेरी कॉमने 2018 साली झालेल्या गोल्डकोस्ट ऱाष्ट्रकुल स्पर्धेत लाईट फ्लायवेट गटात सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम केला होता. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 9 पदके मिळवत पदक तक्त्यात दुसरे स्थान मिळविले होते. बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी यापूर्वीच भारतीय पुरूष मुष्टीयुद्ध संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय महिला मुष्टियुद्ध संघ- नितू (48 कि.), निखत झरिन (50 कि.), जास्मिन (60 कि.), लोव्हलिना बोर्गोहेन (70 कि.)