प्रतिनिधी /धारबांदोडा
तरुण भारतचे धारबांदोडा तालुक्यातील प्रमुख वृत्तपत्र विक्रेते व वितरक निलेंद्र दत्तोबा मराठे (51) यांचे काल रविवार 29 रोजी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरु होते. सायं. 4 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. आज सोमवारी सकाळी 11 वा. धारबांदोडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
तरुण भारतची गोवा आवृत्ती सुरु झाल्यापासून व त्याही पूर्वी दक्षिण गोव्यात हे वृत्तपत्र रुजविण्यासाठी निलेंद्र यांचे वडिल दत्तोबा मराठे यांचे महत्त्वाचे योगदान होते. वडिलानंतर निलेंद्र मराठे यांनी सन 2002 पासून धारबांदोडा तालुक्यातील विक्रेते व वितरक म्हणून जबाबदारी स्वीकारली. मध्यंतरी काही काळ धारबांदोडय़ातील वार्ताहर म्हणूनही ते काम पाहत होते. बरीच वर्षे स्वतः वाहन घेऊन त्यांनी वृत्तपत्रांचे गठ्ठे गावोगावी पोचविले. त्यांच्या मेहनती वृत्तीमुळे धारबांदोडा तालुक्यातील खेडोपाडी तरुण भारत पोचला. हल्ली प्रकृती अस्वास्थ्यामुळे वितरणाची ही जबाबदारी त्यांनी कामगारांवर सोपवली होती. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगी शांभवी, मुलगा आदित्य तसेच भाऊ निळकंठ मराठे असा परिवार आहे.