ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांचे खंदे समर्थक निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी माझिरे यांचा पक्षप्रवेश पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माझिरे यांच्यावर माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.
माझिरे यांची मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदावरुन तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून माझिरे यांनी आपल्या 400 कार्यकर्त्यांसह पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला.त्यानंतर नीलेश माझिरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांची भेट घेतली होती. त्यामुळे नीलेश माझिरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशी शक्यता होती. अखेर माझिरे यांनी काल रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवास्थानी शिंदे गटात प्रवेश केला.
अधिक वाचा : शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
माझिरे हे वसंत मोरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मोरे पुणे शहराध्यक्ष असताना त्यांनीच माझिरेंना पक्षात सामील पेले होते. माझिरे यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचा आणि आमचा संबंध संपला, अशी थेट भूमिका वसंत मोरेंनी घेतली होती. तर दुसरीकडे मोरेंना माझी गरज नाही तर मलाही मोरेंची गरज नसल्याचे माझिरे यांनी म्हटले होते.