पुणे / प्रतिनिधी :
खूनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, अवैध दारू विक्री करणे अशाप्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत नऊ गुन्हेगारांना एकाचवेळी तडीपार करण्यात आल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हिऱ्या ऊर्फ अजीज सलामत शेख (रा. गुलटेकडी, पुणे), शंकर नागप्पा निकले (32, रा. गुलटेकडी, पुणे) व रोशन मिठ्ठू घोरपडे (19, रा. गुलटेकडी, पुणे), सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील महेश अनिल साळुंखे (वय 25, रा. धनकवडी, पुणे), शुभम सीताराम शिंदे (20, रा. धनकवडी, पुणे), भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील विशाल बालाजी सोमवंशी (21, रा. आंबेगाव खु. पुणे), सुजित दत्तात्रेय पवार (20, रा. आंबेगाव, पुणे), आकाश रविंद्र उणेचा (20, रा. कोंढवा) आणि सुजित सुरेश सरपाले (26, रा. कात्रज, पुणे) या आरोपींचा समावेश आहे. या आरोपींवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कायद्याचा दबाव रहावा म्हणून संबंधित पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तडीपार प्रस्ताव पाठविला होता. त्यावर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी प्रस्तावाची चौकशी पूर्ण करून नऊ गुन्हेगारांविरूद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 व 56 प्रमाणे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्हय़ातून संबंधितांना एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.
अधिक वाचा : दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र सोमवारपासून उपलब्ध
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यापुढील काळातदेखील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अशाचप्रकारची ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.