ऑनलाईन टीम/तरुण भारत
मालदिवची राजधानी माले येथे गुरुवारी विदेशी कामगारांच्या घरांना लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पैकी ९ जण भारतीय आहेत. तसेच अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मालदिवमधील भारतीय दूतांकडूनही याबाबतचे एक ट्वीट करण्यात आले असून त्यांनी मदतीसाठी फोन नंबरही दिले आहेत. (Nine Indians Among 10 Killed In Fire In Maldives)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालेतील परदेशी कामगारांच्या घरांमध्ये ही आग लागली. या आगीत १० जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ९ जण भारतीय असल्याची माहिती समोर येत आहे. ग्राउंड फ्लोअरला एका वाहने दुरुस्त करणाऱ्या गॅरेजमध्ये आग लागली होती. त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी चार तास अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न करण्यात आले. या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीला आग लागली होती. तेथून १० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, यातील नऊ जण हे भारतीय तर एक बांगलादेश येथील आहे. या घटनेनंतर मालदीव येथील भारतीय दुतावासाने माले येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच आम्ही मालदीव येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी +९६०७३६१४५२ आणि +९६०७७९०७०१ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.