गॅरेजमधील दुर्घटनेत 28 जणांना वाचविण्यात यश
माले / वृत्तसंस्था
मालदीवच्या माले शहरातील एका इमारतीच्या गॅरेजमध्ये गुरुवारी आग लागली. या अपघातात 9 भारतीयांसह 11 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी आग आटोक्मयात आणण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या अग्निशमन आणि बचाव सेवेने पुरविलेल्या माहितीनुसार 28 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच 9 जण अद्याप बेपत्ता असल्याचा दावा केला जात असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव मोहिमेदरम्यान आगीत होरपळल्यामुळे जखमी झालेल्यांवर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
बुधवारी मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास एका इमारतीत आग लागल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तळमजल्यावरील गॅरेजमध्ये आग लागल्यामुळे त्याच्या ज्वाळा पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचत होत्या. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित कामगार राहत होते. हे सर्वजण भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेचे रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीयांसोबतच एका बांगलादेशी स्थलांतरिताचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वीच येथे आग लागली होती. या नव्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक तपासाअंती गॅरेजमध्ये ठेवण्यात आलेले गॅस सिलिंडर लीक झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गॅस लिकेजमुळेच आग वेगाने पसरल्यामुळे जीवितहानीचा आकडा वाढल्याचे सांगण्यात आले.