निपाणी : येथील सटवाई रोडनजीक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री 11 च्या सुमारास उघडकीस आली. राहुल अशोक चव्हाण (वय 31) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने रोजगार व विवाह जुळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून समजते.
राहुल हा पदवीधर होता. तो रोजगाराच्या शोधात होता पण त्याला नोकरी मिळत नव्हती. तसेच त्याचे लग्नही झालेले नव्हते. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. सध्या तो मेस्त्री गल्ली येथे आई-वडिलांसमवेत भाडय़ाच्या घरात रहात होता. बुधवारी सायंकाळच्या सुमारास तो घराबाहेर पडला होता. पण रात्री उशिरापर्यंत घरी परतला नव्हता. दरम्यान त्याचे सटवाई रोडनजीक स्वतःचे घर आहे. त्या घरात त्याने आत्महत्या केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर, हवालदार एस. एच. चिकोडे, मंजुनाथ कल्याणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
महात्मा गांधी रुग्णालयात विच्छेदन करुन मृतदेह गुरुवारी सकाळी 11 सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. राहुल याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.