’धरोहर’ संग्रहालयाचे करणार राष्ट्रार्पण
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आज गोव्यात आगमन होत असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने देशातील आपल्या पद्धतीचे एकमेव असलेल्या ’धरोहर’ या राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे त्यांच्याहस्ते राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर अर्थ मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताहाचा समारोपही अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होणार आहे.
राजधानी पणजीत मांडवी नदीकिनारी सुमारे 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या प्रसिद्ध ’ब्लू बिल्डिंग’मध्ये हे संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताह महोत्सवाचा भाग म्हणून या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. पोर्तुगीज राजवटीत या दुमजली इमारतीला ’अल्फांडेगा’ या नावाने ओळखले जात होते.
धरोहर हे देशातील अशा प्रकारचे एकमेव संग्रहालय असून भारतीय सीमाशुल्क विभागाद्वारे देशभरातून जप्त केलेल्या कलाकृती या संग्रहालयात प्रदर्शीत करण्यात आल्या आहेत. ’आईने’ः अकबरीची हस्तलिखिते, अमीन खांबांची प्रतिकृती, जप्त करण्यात आलेल्या धातू तसेच दगडी कलाकृती, हस्तिदंती व वन्यजीव वस्तू, आदी या प्रदर्शनातील प्रमुख लक्षणीय आकर्षणे आहेत.
सीमाशुल्क प्रक्रिया नेमकी काय आहे याची माहिती सामान्य लोकांना व्हावी यासाठी येथे सोय करण्यात आली आहे. नव भारतातील सर्वात ऐतिहासिक अप्रत्यक्ष कर सुधारणा, वस्तू आणि सेवा कर निर्मितीचा प्रवास दर्शविणारी ’जीएसटी गॅलरी’ यांचाही अलीकडेच या संग्रहालयात समावेश करण्यात आला आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
दरम्यान, आज गोव्यात होणाऱया केंद्रीय मंत्र्यांच्या या भेटीचे औचित्य साधून सीबीआयसी, सीबीडीटी, महसूल विभाग, आर्थिक व्यवहार आणि आर्थिक सेवा विभाग, यांच्यातर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून संग्रहालयाच्या राष्ट्रापर्णानंतर वस्तू आणि सेवा कर दालनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘धरोहर’ हा लघुपटही दाखवण्यात येणार आहे.
खास करून मुलांमध्ये जागरूकता व कर साक्षरता निर्माण करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ‘खेळाद्वारे शिका’ उपक्रमांतर्गत मनोरंजक उत्पादने विकसित केली असून अर्थमंत्र्यांच्या हस्ते ’साप-शिडी’ बोर्ड गेम्स, ’इंडिया गेट’ थ्रीडी पझल्स, डिजिटल मनोरंजक पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन तसेच देशाच्या विकासात करांचे योगदान आणि प्रत्यक्ष करांच्या क्षेत्रात केलेल्या सुधारणा दाखवणाऱया चित्रफीतीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
अर्थ मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताहाचा समारोप समारंभ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत शनिवारी गोव्यात होणार आहे.