पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात आली चक्कर
सिलिगुडी / वृत्तसंस्था
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथे एका कार्यक्रमात अचानक चक्कर आल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. मात्र, नंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ठणठणीत झाली. त्यानंतर त्यांनी कारने पुढचा प्रवास पूर्ण केला. पश्चिम बंगालचे भाजप आमदार नीरज जिंपा यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. गुरुवारी ही घटना घडली.
कार्यक्रम संपायला आलेला असताना गडकरींना भोवळ आल्यानंतर जवळच्या रुग्णालयातून काही डॉक्टर्सना बोलाविण्यात आले. गडकरींनी आपल्याला अस्वस्थ वाटू लागल्याचे सांगितले होते. डॉक्टरांनी त्यांना प्रथमोपचार दिले. त्यानंतर त्यांना बरे वाटू लागले. त्यांनी पुढच्या कार्यक्रमांमध्येही भाग घेतला. सध्या ते पश्चिम बंगालच्या दौऱयावर असून या राज्यात त्यांनी अनेक प्रकल्पांची आधारशीला स्थापन केली. नंतर त्यांनी दार्जिलिंगचे खासदार राजू बिष्त यांच्या निवासस्थानी विश्रांती घेतली. बिष्तही या कार्यकमाला उपस्थित होते. गुरुवारी गडकरी यांनी सिलिगुडी भागात 1,206 कोटी रुपये खर्चाच्या तीन राजमार्ग प्रकल्पांची कोनशीला स्थापन केली. या भागात पायाभूत सुविधा वाढविल्या जात आहेत.