Tarun Bharat

बिहारमध्ये नितीशकुमार आठव्यांदा मुख्यमंत्री

Advertisements

उपमुख्यमंत्रिपदी तेजस्वी यादव शपथबद्ध, नितीशकुमार यांची भाजपवर जोरदार टीका

पाटणा / वृत्तसंस्था

संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी बुधवारी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीशकुमार यांनी हिंदीत देवाच्या नावाने शपथ घेतली. त्यानंतर लगेचच तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेताच तेजस्वी यांनी मंचावरच नितीशकुमार यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. नाव न घेता त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही एकजूट दाखविण्याचे आवाहन केले. पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर बोलताना नितीशकुमार यांनी आपण या पदाचा उमेदवार नसल्याचा निर्वाळाही दिला.

शपथविधी सोहळय़ाला बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मातोश्री राबडीदेवी पोहोचल्या होत्या. मात्र, लालूप्रसाद यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. शपथविधीपूर्वी नितीशकुमार यांनी लालूंशी फोनवर बोलून राजकीय परिस्थितीची माहिती दिली. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाईचे वाटप करून आनंद व्यक्त केला. त्यांच्या घराबाहेर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमल्यामुळे जल्लोषाचे वातावरण दिसून येत होते.

एका महिन्यात बंपर नोकऱया ः तेजस्वी यादव

देशाला जे करण्याची गरज होती, ते बिहारने केले. आम्ही त्यांना मार्ग दाखविला आहे. आमचा लढा बेरोजगारीविरुद्ध आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांना गरीब आणि तरुणांच्या वेदना जाणवल्या. आम्ही एका महिन्याच्या आत गरीब आणि तरुणांना बंपर नोकऱया देऊ. ही नोकरभरती इतकी व्यापक असेल की यापूर्वी कधीही असे झाले नसेल, असे आश्वासन शपथविधी सोहळय़ानंतर बिहारचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिली. तसेच महाआघाडी इतकी मजबूत आहे की विधानसभेत फक्त भाजपच विरोधी पक्षात राहील. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतलेला निर्णय कठीण असला तरी तो अत्यंत आवश्यक होता. भाजपकडून जातीय तेढ पसरविली जात आहे. ते प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

आरजेडीला 16, जेडीयूला 13 मंत्रिपदे

विधानसभेतील बहुमत सिद्धतेनंतर नितीशकुमार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजेडीला निश्चित सूत्रानुसार 16 मंत्रिपदे मिळणार आहेत. तर जेडीयूच्या खात्यात 13 आणि काँग्रेसचे 4 आमदार मंत्री होणार आहेत. 12 आमदारसंख्या असलेल्या सीपीआय (एम-एल) ने सरकारमध्ये सामील होण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

पक्षनिहाय संभाव्य मंत्री

@ राजद ः तेजप्रताप यादव, आलोककुमार मेहता, अनिता देवी, जितेंद्रकुमार राय, चंद्रशेखर, कुमार सर्वजीत, बच्चा पांडे, भारत भूषण मंडल, अनिल साहनी, शाहनवाज, अख्तरुल इस्लाम शाहीन, समीर महासेठ, भाई विरेंद्र, ललित यादव, कार्तिक सिंग, वीणा सिंग, रणविजय साहू आणि सुरेंद्र राम.

@ संजद ः विजयकुमार चौधरी, विजेंद्रप्रसाद यादव, अशोक चौधरी, उपेंद्र कुशवाह, शीला कुमारी, श्रवण कुमार, मदन साहनी, संजयकुमार झा, लेशी सिंह, सुनीलकुमार, जयंत राज आणि जमान खान.

Related Stories

केरळमध्ये वाढला मंकीपॉक्सचा धोका

Patil_p

छत्तीसगड : रायपूरमध्ये 22 ते 28 जुलै पुन्हा लॉक डाऊन

Rohan_P

आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट

prashant_c

लवादांमधील नियुक्त्यांकरता 2 आठवडय़ांची मुदत

Patil_p

भारतात 75 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

डिसेंबर 2021 पर्यंत लसीकरण पूर्ण करणार!

Patil_p
error: Content is protected !!