Tarun Bharat

नितीशकुमारांची कसरत

Advertisements

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकताच भाजपशी काडीमोड घेऊन लालू प्रसाद यादव स्थापित राजदशी नव्याने संसार थाटला आहे. या दोन्ही संसारांमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वतःकडेच राहील याची खुबीने तरतूद केल्याचे दिसून येते. तसे नितीशकुमार चाणाक्ष नेते आहेत. कोणाशी केव्हा संधान जुळवायचे याचे त्यांचे काही आडाखे आहेत. त्याप्रमाणे ते जातात. त्यांचा राजकीय प्रवास पाहिला की याची प्रचीती येते. 70 च्या दशकात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून जे नेते निर्माण झाले, त्यांच्यात नितीशकुमारांचाही समावेश होतो. त्या काळात ते लालू प्रसाद यादव यांच्या ‘मंडल’ राजकारणातील सहकारी होते. पुढे त्यांच्या त्यांच्याशी फाटले तेव्हा, भटबामण आणि बनियांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱया भापजशी त्यांचे सख्य जुळले. ते बराच काळ, म्हणजे जवळपास 17 वर्षे टिकले. याच काळात त्यांनी रालोआचा नेता या नात्याने बिहारमध्ये बस्तान बसविले. लालू यादव यांची 15 वर्षांची सत्तेतील मक्तेदारी मोडून काढत त्यांनी बिहारमध्ये भाजपचा हात हाती धरुन नव्या सोशल इंजिनिअरिंगचा श्रीगणेशा केला. लालू प्रसाद यादव यांच्या अनाचारी राजवटीला कंटाळलेले सवर्ण, अतिमागासवर्गीय, दलित आणि इतर मागासवर्गीय आणि हिंदू तसेच काही प्रमाणात मुस्लीम यांची मोट बांधून त्यांनी बिहारमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला. या त्यांच्या प्रवासात त्यांना भाजपचे एकनिष्ठ आणि भक्कम सहकार्य लाभले. 2010 नंतर त्यांना पंतप्रधान बनण्याची आस लागली असावी असे दिसून येते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रालोआला अनुकूल वातावरण असेल असे 2012 पासूनच जाणवू लागले होते. त्यामुळे रालोआची सरशी झालीच तर सर्वसहमतीचा नेता म्हणून आपल्या गळय़ात पंतप्रधानपदाची माळ पडेल असा त्यांचा होरा असावा. पण भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (जे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते) पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे नितीशकुमारांचे मनसुबे उधळले. यांनी संतापून भाजपशी संबंध तोडून लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा प्रयोग करुन पाहिला. पण त्यावेळच्या वातावरणात त्यांचा धुव्वा उडाला आणि अवघ्या 2 जागा पदरात पडल्या. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी पुन्हा ते ज्या घरातून आले त्याच घरात म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर सोयरीक केली. लालू प्रसाद यादव त्यावेळी अनेक चारा घोटाळय़ांमध्ये दोषी ठरल्याने त्यांचा राजकीय प्रभाव घसरणीला लागला होता. नितीशकुमार यांच्या त्या ‘महागठबंधन’ प्रयोगाला घवघवीत यश मिळाले. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. तथापि, राजदशीही त्यांचे पटेना. राजदच्या कार्यशैलीमुळे त्यांची ‘विकासपुरुष’ही प्रतिमा मलीन होऊ लागली. परिणामी राजदच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा बनवून ते पुन्हा भाजपच्या वळचणीला आले. भाजपलाही त्यांची आवश्यकता होतीच. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा सत्तापालट झाला, पण मुख्यमंत्री नितीशकुमारच झाले. 2019 ची निवडणूक दोन्ही पक्ष तसेच रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती यांनी एकत्र लढवून 40 पैकी 39 जागा मिळवत राजद-काँगेसचा धुव्वा उडविला. मात्र, त्यांच्या या राजकीय कोलांटय़ांनी त्यांची प्रतिमा याच कालखंडात घसरणीला लागली आणि पूर्वीचा करिष्मा संपू लागला. याचे प्रत्यंतर 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आलेच. रालोआचा निसटता विजय झाला असला तरी रालोआअंतर्गत कुमार यांच्या संजद पक्षाच्या जागा मोठय़ा प्रमाणात घटल्या. तर भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली. त्यामुळे भाजप आपल्याला खातो की काय, अशी चिंता त्यांच्या मनात निर्माण झाली. त्याच चिंतेपोटी (इतर कोणतेही सबळ कारण फारसे नसताना) त्यांनी भाजपशी घटस्फोट घेऊन पुन्हा लालू प्रसाद पुत्र तेजस्वी यादव यांच्या राजदशी हातमिळवणी केली आहे. हा नवा डाव ते पंतप्रधानपद मिळविण्यासाठी खेळत आहेत, अशी हाकाटी विविध वृत्तवाहिन्यांवरुन त्यांच्या शपथविधीपूर्वीपासूनच सुरु झाली आहे. वृत्त वाहिन्यांचीही गंमत असते. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचंड विजय झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या पंतप्रधानपदी शपथविधीचा मुहूर्त काढण्याचे तेवढे बाकी ठेवले होते. पण महिन्याभराच्या आभासी जल्लोषानंतर त्या आता मागे पडलेल्या दिसतात. गेल्या मार्चमध्ये केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये असाच मोठा विजय मिळविल्यानंतर त्यांच नाव भावी पंतप्रधान म्हणून काही काळ गाजविण्यात आले. आता वृत्तवाहिन्यांवर पंतप्रधानपदी त्यांची जागा नितीशकुमार यांनी घेतली आहे. ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांनी निदान प्रत्यक्ष निवडणुकीत उतरुन स्वबळावर दोन राज्यांमध्ये भक्कम यश मिळविले. पण नितीशकुमार मुख्यमंत्री झाले आहेत, ते उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे जनादेशाला वळसा घालून. उद्धव ठाकरे यांचा हा वळसा त्यांच्याच बहुसंख्य आमदारांनी उलटा फिरवला. आता नितीशकुमार यांचे काय होणार याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. पंतप्रधानपदासाठी ते खरोखरच विरोधी पक्षांचे सहमतीचे उमेदवार ठरतात का हे देखील नंतरच कळणार आहे. पण पंतप्रधान मोदी यांच्या स्पर्धकांच्या संख्येत त्यांच्यामुळे आणखी एकाची भर पडली हे निश्चित, असे अनेक तज्ञ म्हणवून घेणाऱयांचे मत आहे. सध्या या स्पर्धेत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, दिल्लीचे केजरीवाल आणि महाराष्ट्रातून शरद पवार असे विरोधी नेते आहेत. आता नितीशकुमार यांचीही या सूचीत गणना आतापासूनच करण्यात येऊ लागली आहे. पंतप्रधानपद मिळविणे तसे सोपे नाही. केवळ नेता हा त्यासाठी निकष नसतो. लोकसभेच्या किमान 272 जागांचे पाठबळ त्यासाठी आवश्यक असते. वरील चार नेत्यांपैकी एकाचीही अखिल भारतीय प्रतिमा नाही. प्रत्यक्ष त्यांच्या राज्यांमध्येही ते सर्वतोपरी आहेत असेही नाही. अगदी युतीचे पंतप्रधानपद मिळवायचे म्हटले तरी, नेत्याजवळ स्वतःच्या 100-125 जागा असणे आवश्यक आहे. त्या कोठून आणि कशा मिळणार हा प्रश्न आहे. अर्थात याचे नेमके उत्तर मतदार सोडून अन्य कोणी देऊ शकत नाही. तेव्हा, नितीशकुमार यांची पुढची वाटचाल कशी होते, ते कळायला काही काळ जावा लागणार आहे.

Related Stories

गीत झंकारते जीवनाची गझल…

Patil_p

सहिष्णू भाषा

Patil_p

मायनस जीडीपी

Patil_p

काढा रे तो भोंगा

Patil_p

पंचायत निवडणुका होतील, पण अधिकारांचे काय?

Patil_p

उघडले संरक्षण प्रबोधिनीचे दार!

Patil_p
error: Content is protected !!