गोव्यात पीट एनडीपीएस कायद्याचा अंमल सुरु : पकडल्यास जामीन नाही, थेट वर्षभर जेल,दोन दिवसात तिघा डिलर्सच्या आवळल्या मुसक्या
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील अमली पदार्थ व्यवहाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून गत दोन दिवसात तिघा बडय़ा ड्रग डिलरना ताब्यात घेतले आहे. त्यांना एका वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला असून सदर शिक्षा ही अजामीनपात्र आहे.
काल बुधवारी दुपारी पणजी पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
गोव्यावर ‘ड्रग्जभूमी’ असा डाग नको
गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असून ती ओळख कायम ठेवण्यासाठी कार्यरत रहावे लागणार आहे. राज्यात प्रतिष्ठित पर्यटक येणे ही काळाची गरज असून त्यासाठी गोव्यावर ’ड्रगभूमी’ असा डाग लागणे आम्हाला परवडणारे नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ड्रग्ज लॉबीचा पूर्ण बिमोड करणार
आम्ही ड्रग्ज लॉबीचा पूर्ण बिमोड करणार असून त्यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून वावरणार आहेत. खास करून किनारी आणि शहरी भागात रात्री उशिरांपर्यंत चालणाऱया पाटर्य़ांवर ते करडी नजर ठेवणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पीट एनडीपीएस अंतर्गत तिघांना अटक
ड्रग्ज व्यवसायाचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी प्रथमच पीट एनडीपीएस या कायद्याचा वापर सुरू केला असून त्याच कायद्यान्वये दोन दिवसात तिघांना ताब्यात घेतले आहे. वेली डिकॉस्टा (शिरवई-तिळामळ, केपे), एबिलियो (आबेल) डिसोझा आणि आंतोनियो लोपीज दोघेही (हुमतावाडा कळंगूट) अशी त्यांची नावे आहेत. सदर तिघेही डिलर गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच असून अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहेत. अनेक पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी अनेकदा त्यांना पकडण्यातही आले होते.
पाच आठवडय़ांच्या आत सुनावणी
पीट एनडीपीएस समितीत निवृत्त न्यायाधीश व पदसिद्ध अधिकाऱयांचा समावेश असतो. त्यांच्या सल्लागार समितीने शिफारस केल्यासच एखाद्या व्यक्तीला पीट एनडीपीएस कायदा लागू करता येतो. त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडून आदेश जारी करावा लागतो. तसेच या कायद्यांतर्गत एखाद्यास ताब्यात घेण्यात आले तर पाच आठवडय़ांच्या आत त्याची सुनावणी सुरू करावी लागते, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान, हैदराबाद येथील पोलीस आयुक्तांकडून ड्रग्स व्यवसायासंबंधी गोवा पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यासंबंधी विचारले असता, त्या आरोपांना गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावरून आयुक्तांच्या आरोपात काहीच तथ्य नव्हते हेच सिद्ध होत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
फोगट प्रकरणी भाष्य करण्यास नकार
सोनाली फोगट खूनप्रकरणी विचारले असता, या तपासाबाबत कोणतेही भाष्य करण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. तरीही, पोलीस त्यांचे काम करत आहेत आणि त्यात त्यांना यश येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.