Tarun Bharat

होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ।।

Advertisements

अनेक ठिकाणाहून पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकरी हरिनाम संकीर्तन करीत आनंदाने चालत निघालेले आहेत. ना भूक, ना तहान, ना झोप, कशाचीही तमा न बाळगता केवळ पंढरपूरच्या पांडुरंगाची भेट हा एकच ध्यास! या वारीचे महत्त्व सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात, होईन भिकारी। पंढरीचा वारकरी ।। 1।। हाचि माझा नेम धर्म । मुखी विठोबाचे नाम ।।2।। हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ।। 3।। तुका म्हणे देवा । हेचि माझी भोळी सेवा ।। 4।। अर्थात ‘मी वेळ आली तर भिकारी होईन पण पंढरीचा वारकरी होईन. मुखाने विठोबाचे नाम घेणे हाच माझा नित्य नियम आणि हाच माझा धर्म आहे. संतांच्या पायावर डोके ठेवावे हीच माझी उपासना आहे. पांडुरंगा! अशा माझ्या भोळय़ा भक्तीचा भाव आहे,’ वारीमध्ये चालणाऱया प्रत्येक वारकऱयांचा हा भाव असतो. मी भिकारी होईन पण पंढरीचा वारकरी होईन अशी भावना असणे हे नम्रपणाचे लक्षण आहे. जीवनात कितीही महत्त्वाच्या गोष्टी करावयाच्या असल्या तरी हरिभक्ताच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे ते म्हणजे आपले जीवन केवळ वारीपुरतेच नव्हे तर कायम या अभंगात वर्णन केलेल्या भावनेमध्ये जगणे.

भागवत धर्मामध्ये नम्रता हा सर्वात महत्त्वाचा गुण मानला जातो कारण नम्रतेशिवाय भगवंताची आणि त्यांचे नम्र सेवक हरिभक्तांची महती जाणणे शक्मय नाही. काही लोकांना भक्तिमार्ग समजत नाही तो याच कारणाने. कारण त्यांना नम्र होणे म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची, त्यांच्या शक्तीची, त्यांचा प्रभाव यांचा स्वीकार करणे कठीण जाते. सर्व काही विज्ञानाच्या मोजमापात बसविणे हा त्यांचा स्वभाव असतो. पण धर्म, भगवंत, हरिभक्ती ही तथाकथित विज्ञानाच्या आकलनाच्या पलीकडची आहे. इथे नम्रता म्हणजे हरिभक्तांच्या सेवेमध्ये आपली मान प्रति÷ा सर्व काही पाठीमागे ठेवून सहभाग घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या चित्तशुद्धीसाठी सतत हरिनामाचा जप, कीर्तन केले पाहिजे. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ, कपट, द्वेष, राग, मत्सर न ठेवता आपण सर्वांचे सेवक आहोत या  भावनेने वारीमध्ये सहभागी झाले पाहिजे. यासाठी हरिभक्त कोण आणि त्यांची संगत कशी करावी याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्त माझे जिवलग सोइरे। हृदयी पाऊले धरीन त्यांची ।।1।। अंतकाळी येति माझ्या सोडवणे । मस्तक बैसणे देईन त्यांसी ।।2।। आणिक सोईरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवाचोनि नाही मज ।।3।। देईन आलिंगन धरीन चरण । संसार शीण नसे तेणे ।।4।। कंठी तुळशीमाळ नामाचे धारक। ते माझे तारक भवनदीचे ।।5।। तयांचे चरणी घालीन मी मिठी । चाड हि वैकुंठी नाही मज।।6।। आळसे दंभ भावे हरीचे नाम गाती । ते माझे सांगाती परलोकीचे।। 7 ।। काया वाचा मने देईन क्षेम त्यांसी। चाड जीवित्वाची नाही मज ।।8।। हरीचे नाम मज म्हणविती कोणी। तया सुखा घणी घणीवरी।।9।। तुका म्हणे तया उपकारे बांधलो । म्हणऊनि आलो शरण संता ।। 10 ।। अर्थात ‘श्री हरीचे भक्त हे माझे जिवलग असे सोयरे आहेत, म्हणून मी त्यांचे चरण हृदयात धरून ठेवीन. हे हरिभक्तच माझ्या अंतकाळी (मृत्यूसमयी) सोडविण्याकरिता धावत येतील आणि त्यावेळी मी त्यांचे चरणकमल माझ्या मस्तकावर धारण करीन. या वैष्णवांशिवाय मला इतर कोणीही दुसरे सज्जन सोयरे नाहीत. या वैष्णवांना मी आलिंगन देईन, त्यांचे चरण घट्ट धरीन. त्यामुळे माझे संसारदुःख समूळ नष्ट होईल. हे वैष्णव गळय़ात तुळशीची माळ आणि मुखात अखंड हरिनाम धारण करतात. म्हणून तेच मला भवनदीतून तारू शकतात. मी अशा वैष्णवांच्या चरणी मिठी घालीन. त्यांना सोडून मला वैकुंठालाही जाण्याची इच्छा नाही. जे लोक केव्हातरी आळसाने किंवा लोकांनी आपल्याला भक्त म्हणावे या अहंकाराने अथवा शुद्ध भक्तिभावाने हरिनाम गातात असे वैष्णव माझे परलोकीचे सोबती आहेत. मी अशा वैष्णवांना काया, वाचा आणि मनाने आलिंगन देईन, त्यांची सेवा करण्यासाठी मी जीवाचीही पर्वा करणार नाही. कोणी मला माझ्या मुखातून हरिनाम घेण्याची प्रेरणा देईल, तर असे सुख माझी इच्छा तृप्त होईपर्यंत घेत राहीन. अशाप्रकारे मी वैष्णवांच्या उपकाराने ऋणी झालो आहे. म्हणूनच मी अशा वैष्णव संतांना शरण आलो आहे. 

 भगवद्भक्तांचा संग हा या भौतिक जगात अत्यंत दुर्मीळ आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवदगीतेमध्ये सांगतात (भगी 7.19) बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते। वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः।। अर्थात ‘अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो, मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो’ विशेषतः या कलियुगामध्ये सामान्य लोक स्वार्थी बनून स्वतःच्या इंद्रियतृप्तीपलीकडे काही समजू शकत नाहीत. यावेळी हरिनामाचा जप करणाऱया शुद्ध भक्तांचा सत्संग आपल्याला लाभला तर आपण स्वतःला अत्यंत भाग्यवान समजावे. मग असे भक्त नवीन साधक असोत अथवा शुद्ध वैष्णव भक्त असोत, असे हरिभक्तच केवळ या जगातील नव्हे तर भगवत धामाला जाणाऱया मार्गावर आणि नश्वर अशा भगवत धामातही आपले सोबती आहेत. असे परम सत्याच्या शोधार्थ निघालेले साधक कधीच भोगविलासाच्या अनावश्यक कार्याद्वारे प्रलोभित होत नाहीत, कारण परम सत्याच्या शोधात त्यांना दिव्यानंदाचा अनुभव होत असल्याने त्यासमोर बाकी सर्व तुच्छ वाटू लागते. त्यामुळे जीवनातील प्रत्येक स्थितीत आपण परम सत्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे व्यक्ती भोगविलासाच्या कार्यापासून दूर राहते आणि परिणामतः त्याला वास्तविक सुख प्राप्त होते. असा वास्तविक आनंद प्राप्त झाल्यावर हरिभक्ताचे मन पांडुरंगाच्या चरणी स्थित होते.

हरिभक्तांसाठी ही वारी केवळ 20/22 दिवसांचीच नाही, तर त्यानंतर चतुर्मास येतो. या चतुर्मासामध्ये हरिभक्त आपली भक्ती, भगवत्सेवा दिवसेंदिवस वाढवित जातात, कार्तिक हा महिना तर भक्ती जास्तीत जास्त करण्यासाठीच असतो. त्यानंतर वर्षभर अशीच आपापल्या घरी, गावी हा विठ्ठल भक्तीचा आनंद हरिभक्त नित्य अनुभवत राहतात. हेच त्यांचे जीवन बनते. ही अवस्था म्हणजेच वैकुंठ निवास, जेथे भगवान श्रीकृष्ण हे जीवनाचे केंद्र बनतात. म्हणून अशा  हरिभक्ताबद्दल तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी । खेपा वैकुंठ बंदरी ।।1।। तया नाही आणिक पेणें । सदा वैकुंठी राहणे ।।2।। आला गेला केल्या यात्रा। उद्धरिले कुळा सर्वत्रा ।।3।। तुका  म्हणे नाही । यासी संदेह कल्पांतीही ।।4।। अर्थात ‘जो पंढरीचा वारकरी असतो, तो नेहमी वैकुंठात राहतो, तेथून येतो जातो, त्याचा इतर कोठेही मुक्काम नसतो. त्याच्या येण्याजाण्याने एक प्रकारची यात्राच घडते आणि तो जेथे जातो त्या कुळाचा तो उद्धार करतो. ही वस्तुस्थिती आहे आणि कल्पांतीही ह्यात कोणता संदेह बाळगण्याचे कारण नाही.’

अशी ही वारकऱयांची महती आहे. म्हणूनच साधा भोळा, अशिक्षित दिसणारा, कोणतेही तथाकथित वैभव जवळ नसताना आपल्या प्रेमाने आणि वैष्णवसेवेने आपले आराध्य दैवत पांडुरंगाला प्रसन्न करतो आणि त्याचे चित्त हरण करतो. हीच मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.

-वृंदावनदास

Related Stories

मोदींचा शंखनाद: युद्ध होणार की टळणार?

Patil_p

यंदा मुंबईला मान्सूनची समाधानकारक साथ

Patil_p

वर्क फ्रॉम ऑफिस ट्रेंड पुन्हा परतला

Patil_p

आपण सारेच पोटार्थी !

Amit Kulkarni

पंचाईत!

Patil_p

रामाचा एक गुण तरी अंगीकारुया!

Patil_p
error: Content is protected !!