राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात मल्लखांब खेळासाठी व्यवसायिक प्रशिक्षक नाही. तरीही गोव्याने गुजरात येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांब क्रीडा प्रकारात भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात कोने-प्रियोळ येथील युतिका राजू सतरकर हिने गोव्याला कास्य पदक मिळवून दिले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
युतिका सतरकर ही प्रियोळ येथील स्वस्तिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. याच विद्यालयाच्या आवारात तिने गेले 20 दिवस मल्लखांबचे प्रशिक्षण घेतले. सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही सत्रात मल्लखांब खेळाडूना प्रशिक्षण दिले जात होते. गोव्यात व्यवसायिक प्रशिक्षक नसल्याने गोवा मल्लखांब असोसिएशने खास महाराष्ट्रातून प्रशिक्षक उलपब्ध करून दिला. त्याच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबीर सुरू होते. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व मल्लखांब खेळाडूंनी कसून सराव केला होता. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती अशी माहिती स्वस्तिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक प्रज्योत नाईक यांनी दिली. सद्या प्रज्योत नाईक हे मल्लखांब खेळाडूसह गुजरातला आहेत.
कोने हा जेमतेम 35 घरांचा छोटासा गांव. या गावात जन्मलेल्या युतिकाची घरची परिस्थिती देखील तशी बेताचीच. आई-वडिल फर्मागुडीवर छोटासा गाडा चालवून उपजीविका चालवितात. युतिकाने स्वस्तिक विद्यालयात शिकत असतानाच मल्लखांबचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. संपूर्ण फोंडा तालुक्यात मल्लखांब हा क्रीडा प्रकार सुरू करणारे ते पहिले विद्यालय. मल्लखांबची आवड असल्याने पालकांनी तिच्यावर बंधने न घालता तिला प्रोत्साहन दिले. काल मंगळवारी तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोरीवरील मल्लखांब प्रकारात गोव्याला कास्यपदक प्राप्त करून दिले.
गोव्याला व्यवसायिक मल्लखांब प्रशिक्षकाची गरज
गोव्यात मल्लखांब बऱयापैकी रूळला आहे. अनेक विद्यार्थी या क्रीडा प्रकारात पुढे येत आहेत. त्यांना व्यवसायिक प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत प्रज्योत नाईक यांनी व्यक्त केले. जर व्यवसायिक प्रशिक्षक लाभला तर गोवा नक्कीच याहून अधिक चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोव्यात आज मल्लखांबसाठी इंडोर स्टेडियमची सोय नाही. त्यामुळे उघडय़ावरच मल्लखांब खेळावा लागतो किंवा प्रशिक्षण द्यावे लागते. त्यामुळे पावसाळय़ात जवळपास चार महिने मल्लखांब खेळांडूना सराव करता येत नाही. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी करताना गोव्यातील मल्लखांब खेळांडूना पावसाचा सामना करीत प्रशिक्षण घ्यावे लागले होते, याकडे प्रज्योत नाईक यांनी लक्ष वेधले.
मल्लखांब स्पर्धा खुपच कठीण होती. त्यात युतिकाने कास्य पदकाला गवसणी घातली ही आपल्यासाठी खुपच आनंदाची गोष्ट होती, अशी प्रतिक्रिया प्रज्योत नाईकने व्यक्त केली. या क्रीडा प्रकारात एकूण 10 गुण असतात. त्यात युतिकाने 9 गुण प्राप्त करत गोव्याला कास्यपदक प्राप्त करून दिल्याचे त्यांनी सांगितले. गोव्याच्या मल्लखांब संघात प्रियोळच्या स्वस्तिक विद्यालयाचे तीन माजी विद्यार्थी तर दोन विद्यामान विद्यार्थी होते. गोव्याच्या संघात एकूण 12 खेळाडूचा समावेश होता. त्यात सहा पुरूष व सहा महिलांचा समावेश होता.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झालेले आहेत. त्यात गोव्याच्या महिला संघाने 6व्या स्थानी झेप घेतली आहे, तर पुरूष संघ 8व्या स्थानी आहे.
दरम्यान, युतिका सतरकर हिने मल्लखांबमध्ये गोव्याला कास्य पदक प्राप्त करून दिल्याने वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा मल्लखांब संघटनेचेअ अध्यक्ष मिथील ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, भाजपचे सरचिटणीस व माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक तसेच असंख्य क्रीडाप्रेमींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. पहिल्याच प्रयत्नात गोव्याला कास्य पदक मिळवून दिल्याने गोव्यात मल्लखांब अधिक लोकप्रिय होईल असा विश्वास व्यक्त करतानाच युतिकाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.