Tarun Bharat

नुकसान भरपाई नको, हत्तीमुक्त करा!

कोकणातील तिलारी खोऱ्यात गेली 22 वर्षे रानटी हत्तींचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. हत्तीकडून होणाऱ्या शेती, बागायतींच्या नुकसानीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हत्ती संकटामुळे शेतकरी वर्ग भयभीत होऊन शेती करायचीच सोडून देऊ लागला आहे. भरपाईही पुरेशी मिळत नाही. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई नको, ‘हत्तीमुक्त’ करा अन्यथा हत्तींना शूट करण्याची परवानगी द्या, अशी मागणी हतबल झालेल्या शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.

कोकणामध्ये गेल्या 22 वर्षांपासून रानटी हत्तींचा प्रश्न सुटलेला नाही. शासनकर्त्यांकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने हत्तीमुक्त करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. एवढे करूनही शासनाला जाग येत नसल्याने तिलारी खोऱ्यातील सर्व सरपंच एकवटले आहेत. हत्ती घरापर्यंत पोहोचले, तरी वन विभाग हत्तीप्रश्नावर गंभीर नसल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा सर्व आजी-माजी सरपंचांनी दिला आहे.

2002 मध्ये सर्वप्रथम सात हत्तींचा कळप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला. त्यानंतर पुढील वर्षभर या कळपाच्या हालचाली दोडामार्गपुरत्याच मर्यादित होत्या. 2004 मध्ये आठ हत्तींनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला. मात्र पुन्हा दोडामार्ग तालुक्यात 25 हत्ती आले. त्यापैकी 16 हत्तींना मागे पिटाळून लावण्यात वन विभागाला यश आले. मात्र राहिलेले नऊ हत्ती सिंधुदुर्गवासी झाले व दोडामार्ग तालुक्यातच नाही तर इतर तालुक्यांतही भर वस्तीमध्ये फिरू लागले आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. भातशेती, माड बागायती, केळीचे अतोनात नुकसान या हत्तींनी केले. 2009 मध्ये एकूण 17 हत्ती असल्याचे सांगितले जात होते. हत्ती स्थिरावू लागले व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वन विभागाने हत्ती पकड मोहिमेची तयारी केली. आसाममधून विशेष पथक मागविण्यात आले. या मोहिमेत दोन हत्तींचा मृत्यू झाला. त्यानंतर 2015 मधील हत्ती पकड मोहिमेनंतर पकडलेल्या तीन नर हत्तींपैकी दोन हत्तींचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर पुढील काळात हत्ती हटावसाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत. अधून-मधून कायमच तिलारी खोऱ्यात हत्तींचे वास्तव्य राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना भयमुक्त करण्यासाठी शासनाने आता तरी लक्ष दिले पाहिजे.

आज हत्तींना रोखले नाही, तर भविष्यात शेती पूर्णत: नष्ट होईल, हे निश्चित आहे. वन विभागाला स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार सहकार्य केले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. वन विभाग शासनाची दिशाभूल करीत हत्ती गणना शून्य दाखवून हत्ती कर्नाटकचे म्हणून सांगतात. तिलारी खोऱ्यात नऊ महिने हत्ती दिसतात आणि पिल्लूही असते. मग तिलारीत हत्तींचे प्रजनन झालेले असून सुद्धा स्थानिक वन विभाग ते नाकारून आपली जबाबदारी ढकलण्याचे काम करीत आहे. पावसाळ्यात हत्ती कर्नाटकात जात नाहीत, तर ते तिलारीच्या बुडित क्षेत्रातच असतात, हे स्थानिक लोक व सर्व सरपंच ठामपणे सांगत आहेत.

हत्ती हाकलण्याच्या बहाण्याने वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी पेट्रोलिंग केल्याचे फक्त भासवतात. कारण त्यांच्याकडे उपाययोजनाच काही नाहीत. तिलारी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात काजू बागायती आहेत. परंतु, हत्तींच्या भीतीने शेतकरी बागायतीत काजू गोळा करण्यासाठी जात नाहीत. केळी बागायतींचेही या हत्तींनी अतोनात नुकसान केले आहे. शिवाय जंगली गवारेडे, माकडे यांचाही उपद्रव सुरुच आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदार आता शेती, बागायती करणेच सोडून देऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत वन विभाग शेतकऱ्यांना अभय कसे काय मिळवून देणार, हे त्यांनी जाहीर करायला हवे. आसाम राज्यात ज्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबविली जाते, त्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राबविणे आवश्यक आहे. अनेक उद्योजकही हत्ती दत्तक घेऊ शकतात.

हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिली म्हणून शासनाकडून सांगितले जाते. परंतु, जी दिली जाते, ती फारच तुटपूंजी दिली जाते आणि त्यात स्थानिक पिकांना भरपाई मिळत नाही. मुळात तिलारी खोऱ्यात वृक्षशेती आहे. तीच संकटात आहे. गेल्या 22 वर्षांपासून हत्तींकडून नुकसान केले जात आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकरी-बागायतदारांनी शेती-बागायती करणेच सोडून दिले आहे. त्यामुळे शेती-बागायतीच नाही, तर भरपाई मिळणार कुठून, हा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई नको. हत्तीमुक्त करा, अशी मागणी केली जात आहे.

तिलारी खोऱ्यात सातत्याने हत्तींच्या संकटाचा सामना करावा लागत असताना शासन मात्र लक्ष देत नाही म्हणूनच आता तिलारी खोऱ्यातील आजी-सरपंच एकवटले आहेत व तिलारी खोरे हत्तीमुक्त करा, अन्यथा 1 एप्रिलनंतर तीव्र आंदोलन छेडू, अशी डेडलाईन दिली आहे. तरी देखील अजूनपर्यंत हत्ती प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्याने प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी आहे. तिलारी खोऱ्यात पाच हत्ती सध्या आहेत. सध्या तर काजूचा हंगाम असूनही बागायतीत जाण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. हत्ती आले, तर इतर सर्व शेतकऱ्यांना अलर्ट करणे सोपे होते. परंतु, सध्या तिलारी खोऱ्यात नेटवर्कच नसल्याने मोबाईलवर संपर्क करणे सुद्धा शक्य होत नाही. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत मेसेज देणारी वॉकीटॉकी यंत्रणा बसवायला हवी.

प्रशासनाने हत्ती लोकवस्तीनजीक येण्यापूर्वी पूर्वसूचना देणारी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. हत्ती पकड मोहिमेत गुंतविण्यात येणारा पैसा जर हत्तीग्रस्त गावांमध्ये सायरन, फ्लॅश लाईट, रेडिओ कॉलर, कम्यूनिटी गार्डनिंगमध्ये गुंतवल्यास मानव हत्ती संघर्ष निवळण्यास मदत होईल. हत्तींचा उपद्रव सतत 22 वर्षे सुरू असूनही त्यांच्या संवर्धनासाठी कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले जात नाही. उलट त्यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी पैसा खर्च होतो. नुकसानीवर खर्च करण्याऐवजी तिलारी खोरे हत्तीमुक्त करण्यासाठी ज्या-ज्या उपाययोजना करणे शक्य आहेत, त्या प्राधान्याने केल्या पाहिजेत. अन्यथा शेतकरी, बागायतदारांना पुढे-पुढे जगणे मुश्किल होईल.

संदीप गावडे

Related Stories

भारताची आजपासून कसोटी अजिंक्यपदासाठी लढत

Amit Kulkarni

लसीकरणात गोंधळ नको

Patil_p

राज्याला राजकीय स्थैर्य मिळु दे !

Patil_p

(कू)विख्यात हॅकर्स – 2

Patil_p

तुझें पातिव्रत्य भलें

Patil_p

तूच सूर ठावा मजसी…

Patil_p
error: Content is protected !!