प्रतिनिधी /मोरजी
मांदे पंचायतीचे सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर 24 तासांच्या आत दाखल केलेल्या अविश्वास नोटिसीवर सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत सदर नोटिसीवर चर्चा होऊन ठराव 7 विरूध्द 4 असा मंजूर करण्यात आला. विरोधी पॅनेलचे 7 पंचायत सदस्य असल्यामूळे त्यांच्या गटाचा नवा सरपंच मांदे पंचायतीचा कारभार हाताळणार हे सिध्द झाले.
मांदे पंचायतीत सरपंच निवडीवरुन दोन गट पडल्याचे स्पष्ट झाल्याने दयानंद सोपटे समर्थक कोनाडकर यांच्या विरोधात जित आरोलकर यांच्या गटाने अविश्वास प्रस्ताव आणला होता. याचा आता निर्णय लागला आहे. ज्यात महेश कोनाडकर यांना संरपंच पद सोडावे लागले.
पंचायत सदस्य प्रशांत नाईक, तारा हडफडकर, शेरॉन अमरोष फर्नांडिस, रॉबर्ट फर्नांडिस, किरण सावंत, मिंगेल फर्नांडिस आणि अमित सावंत या सात पंच सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर उपसारपंच चेतना पेडणेकर, संपदा आजगावकर, राजेश मांदेकार व महेश कोनाडकर या चार पंचायत सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.
सरकारने असा कायदा करावा की किमान तीन महिने तरी कोणत्याच सरपंच, उपसरपंचावर अविश्वास आणू नये. आपण अनुभवी असल्याने हा अविश्वास ठराव मान्य केला. एखाद्या नवीन सरपंच किंवा उपसरपंच हे प्रथमच निवडून आलेले असतील व त्यांच्यावर अविश्वास आणला तर तो त्यांना पचवता येणार नाही. विरोधी गटात एकमेव अनुभवी पंच म्हणून तारा हडफडकर आहेत, इतर सगळेच नवीन आहेत, आपला त्यांना विकासासाठी सदैव पाठिंबा राहील. नवीन सरपंचाला आपण आताच शुभेच्छा देतो असे महेश कोनाडकर यांनी सांगितले.