तालिबानशी आमचा थेट संपर्क ः अमेरिका
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
तालिबानचे भय दाखवून जगाकडून पैसे उकळण्याचा पाकिस्तानचा डाव अयशस्वी होत आहे. अफगाणिस्तानात तालिबानसोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीची गरज नाही. अफगाणिस्तानात मोहीम साकारण्यासाठी पाकिस्तानी हवाईक्षेत्राची कुठलीच आवश्यकता नसल्याचे अमेरिकेच्या बिडेन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे हे वक्तव्य पाकिस्तानसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तान 90 च्या दशकापासूनच अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांना तालिबानची भीती दाखवून पैसे उकळत राहिला आहे.
अफगाणिस्तानातून सोव्हिएत संघाच्या रशियाला हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेला मदत करत पाकिस्तानने मोठी रक्कम उकळली होती. पुढील काळात तालिबान अमेरिकेसाठी धोकादायक ठरल्यावर पाकिस्तानने 2008 पर्यंत याच भीतीच्या जोरावर पुन्हा अमेरिकेकडून प्रचंड निधी अन् सैन्यमदत प्राप्त केली होती.
अमेरिकेला अफगाणिस्तान-तालिबानसोबत स्वतःचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान किंवा अन्य कुठल्याच देशाची गरज नाही. तालिबानसोबत मी नियमित संपर्कात आहे. अमेरिकेच्या प्रशासनातील माझे अन्य सहकारीही यात सामील आहेत असे अफगाणिस्तानसाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी थॉमस वेस्ट यांनी सांगितले आहे.
अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्यासाठी पाकिस्तानच्या हवाईक्षेत्राची गरज असल्याची धारणा वेस्ट यांनी एका मुलाखतीत फेटाळून लावली आहे. तालिबानने दहशतवाद विरोधातील स्वतःच्या प्रतिबद्धता पूर्ण करण्यासाठी आम्हाला कूटनीति जारी ठेवण्याची गरज आहे. अफगाणिस्तानसोबत सीमा असलेल्या अन्य देशांमध्ये दहशतवाद फैलावू नये हे सुनिश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे वेस्ट म्हणाले.
ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेतली होती. त्यानंतर आम्ही आमच्या क्षमतांची पुनर्रचना केली आहे. अमेरिका किंवा आमच्या सहकाऱयांना दहशतवाद्यांनी पुन्हा कधीच धमकी देऊ नये यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. चालू वर्षाच्या प्रारंभी काबूलमध्ये अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीला ड्रोन हल्ल्यात ठार केल्यावर अमेरिकेच्या नागरिकांचे रक्षण करण्याची क्षमता आमच्याकडे असल्याचे दाखवून दिल्याचे वेस्ट यांनी म्हटले आहे.