खानापूर नवीन बसथांब्याच्या ठिकाणी बसेस थांबविण्याची सूचना
वार्ताहर / खानापूर
खानापूर शिवस्मारक चौक परिसरात बसथांब्याच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने नंदगड, हल्याळ, लोंढा, अनमोड, गोवा भागात जाणाऱया सर्व बसेस हेस्कॉम कार्यालयासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या बसथांब्याच्या ठिकाणीच थांबविण्याचे सक्त आदेश जारी केले आहेत. त्यामुळे बुधवारपासून शिवस्मारक चौक परिसरात नो-पार्किंगमुळे बॅरिकेड्स लावून बंदी घालण्यात आली आहे.
बेळगाव तसेच खानापूर बस आगारातून लोंढा, रामनगर, गोवा तसेच नंदगड, बिडी, हल्याळसह तालुक्मयाच्या इतर भागात जाणाऱया सर्व बसेस शिवस्मारक चौकात उभ्या केल्या जात होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी बसथांब्याचे ठिकाण होते. शेतकी सोसायटीजवळ नव्याने निवारा शेड बांधण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. आता याच ठिकाणी बसेस व इतर वाहने थांबविण्यासाठी खानापूर पोलिसांनी शिवस्मारक चौकात बॅरिकेड्स लावून नो-पार्किंग नामफलक लावला आहे.
पोलीस प्रशासनाने आता या बस थांब्याव्यतिरिक्त परिसरात पार्किंग अथवा वडाप टेंपो थांबवून अडचण केल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी दिले आहेत. यापुढे बस व इतर वाहने सोसायटीच्या बाजूला नव्याने बसथांबा आहे तेथेच थांबविण्यात यावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवस्मारक चौकात होणाऱया गर्दीवर नियंत्रण येणार आहे. मात्र, हे कायमस्वरुपी होणे गरजेचे आहे. अन्यथा, या पूर्वीही असे प्रयत्न झाले होते. यासाठी पोलीस खात्याने कायमस्वरुपी नजर ठेवणे गरजेचे आहे.