कला अकादमीच्या नूतनीकरणात, पुनर्बांधकामात कोणताही घोटाळा नसल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला असून कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना त्यांनी ‘क्लिन चिट’ दिली आहे. पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये होणाऱया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कला अकादमी संकुलाचा काही भाग खुला करण्यात येणार असून डिसेंबरमध्ये सर्व काम पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ. सावंत यांनी काल गुरुवारी सायंकाळी मंत्री गावडे व साबांखामंत्री नीलेश काब्राल यांच्यासह इतर तांत्रिक लोकांना घेऊन कला अकादमीच्या वादग्रस्त बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, विरोधक उगाचच विनाकारण आकडे फुगवून त्यांचा खेळ मांडत आहेत. घोटाळ्य़ाचे आरोप निराधार असून सर्व प्रक्रिया योग्य आहे.