केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची स्पष्टोक्ती : 24 रोजी न्यायालयीन याचिकेवर सुनावणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी रविवारी कुतुबमिनारमधील वादावर स्पष्टीकरण देताना उत्खननाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे सांगितले. कुतुबमिनारजवळ असलेल्या मशिदीपासून 15 मीटर अंतरावर उत्खनन केले जाऊ शकते, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाल्यानंतर त्यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले. तसेच
ज्ञानवापी मशिदीपाठोपाठ कुतुबमिनारसंबंधीही वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कुतुबमिनारचे सर्वेक्षण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्यावतीने आता कुतुबमिनार संकुलात पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) कडून कोणतेही उत्खनन केले जाणार नाही. आतापर्यंत सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठकही घेतली होती. कुतुबमिनारमध्ये शेवटचे उत्खनन 1991 मध्ये झाले होते.
न्यायालयात याचिका
दिल्लीच्या साकेत न्यायालयात कुतुबमिनार संकुलातील पूजेची मागणी करणाऱया याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या याचिकेवर आता 24 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. संयुक्त हिंदू आघाडीने 2022 मध्ये याचिका दाखल केली होती. कुतुबमिनार येथे असलेली कुव्वत-उल-इस्लाम मशीद हिंदू आणि जैन धर्माची 27 मंदिरे पाडून बांधण्यात आली होती. अशा स्थितीत तेथे पुन्हा मूर्ती स्थापन करून पूजेला परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.