Tarun Bharat

भौतिक शास्त्राचे नोबेल तीन संशोधकांना

Advertisements

स्टॉकहोम / वृत्तसंस्था

जॉन क्लाऊसर, ऍलेन ऍस्पेक्ट आणि अँटोन झिलिंगर या संशोधक त्रयीला यंदाचा भौतिक शास्त्राचा (फिजिक्स) नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. क्वांटम् मेकॅनिक्स या शाखेत मौलिक आणि कलाटणी देणाऱया संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल, असे नोबेल समितीने स्पष्ट केले आहे. हे पुरस्कार रॉयल स्वीडीश ऍकॅडमीकडून प्रत्येक वर्षी देण्यात येतात.

या शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे क्वांटम् तंत्रज्ञानात नवी आणि मोलाची भर पडली आहे. त्यांनी काही नवी साधने आणि उपकरणे निर्माण केलेली आहेत. त्यांचे संशोधन एन्टँगल्ड क्वांटम् स्टेटस् या शाखेतील आहे. दोन सूक्ष्मकण एकमेकांपासून वेगळे केले तरी ते एकमेकांसारखेच वागतात, हे त्यांच्या संशोधनाचे मूलसूत्र आहे.

क्वांटम् संगणक बनविण्यासाठी उपयुक्त

अणूंमधील सूक्ष्मकणांसंबंधी सध्या अभ्यास सुरु आहे. विशेषतः फोटॉन्ससंबंधी संशोधनावर शास्त्रज्ञांचा भर आहे. या संशोधनातूनच भविष्यकाळात क्वांटम् संगणक ही संकल्पना साकारणार आहे. तसेच मोजमापामधील अचूकता, क्वांटम् नेटवर्कस्ची निर्मिती आणि क्वांटम् तंत्रज्ञानाच्या आधारे दूरसंचार आदी सोयी उपलब्ध होणार आहेत, ज्या आजच्या सोयींपेक्षा अधिक आधुनिक असतील.

क्वांटम् तंत्रज्ञानाचा पाया घातला

या तीन संशोधकांनी भविष्यकालीन क्वांटम् संशोधनाचा पाया घातला आहे असेच महत्वाचे परिणामही आपल्या जटील प्रयोगांमधून मिळविले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांचे संशोधन या शास्त्राला नवी वाट दाखविणारे आहे, अशी प्रतिक्रिया विज्ञान विश्वातून व्यक्त केली जात आहे.

तिघांची तीन स्वतंत्र संशोधने

यंदाचे भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक तिघांना संयुक्तरित्या मिळाले असले तरी त्यांचे संशोधन भिन्न आहे. ऍलेन ऍस्पेक्ट यांनी एक महत्वाच्या ‘लूपहोल’ची निर्मिती केली आहे. अणूंमधील सूक्ष्मकणांची जोडी मूळ स्रोतापासून वेगळी काढल्यानंतरही तिच्या चलनवलनात समानता राहते, हे त्यांनी दाखविले. तर अँटन झेलिंगर यांनी त्यांच्या सहकाऱयांसह संशोधन करुन क्वांटम् टेलिपोर्टेशन नामक तत्वाचा शोध लावला आहे. यामुळे क्वांटम स्थिती एका सूक्ष्मकणाकडून त्याच्यापासून अंतरावर असणाऱया दुसऱया सूक्ष्मकणाकडे नेली जाऊ शकते. जॉन एफ. क्लाऊसर यांनीही एन्टँगल्ड क्वांटम स्टेटस् याच शाखेत संशोधन करुन अणूंच्या अंतरंगातील अतिसूक्ष्म कणांच्या हालचाली आणि या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱया अणुगर्भातील शक्ती यांच्यावर मोलाचे संशोधन करुन एक व्यवहारीदृष्टय़ा उपयुक्त असे क्वांटम प्रारुप निर्माण करण्यात यश मिळविले आहे.

क्वांटम् तत्व म्हणजे काय ?

अणूच्या केंद्राभोवती ऊर्जेचे विविध स्तर असतात. या स्तरांमधून इलेक्ट्रॉन्सचे परिभ्रमण अणुकेंद्राभोवती होत असते. या ऊर्जास्तरांचा अभ्यास करणाऱया शाखेला क्वांटम् फिजिक्स असे म्हणतात. भौतिक शास्त्राची ही शाखा अणुगर्भातील अतिसूक्ष्म कण, त्यांची क्षमता, त्यांचा व्यवहारी उपयोग आणि त्यांच्या विशिष्ट परिस्थितीत होणाऱया हालचाली व या हालचालींचे नियंत्रण यांचा अभ्यास करते.

Related Stories

मिकी माउसच्या जगात राहण्याची संधी

Patil_p

‘बर्निंग बोट’मध्ये 36 जणांचा मृत्यू

Patil_p

अमेरिकेत नव्या नशेची महामारी

Patil_p

भारतीय लस चीनला झोंबली

Patil_p

टेक्सासमध्ये प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू

datta jadhav

भारताची लोकसंख्या 2027 नंतर सर्वाधिक होणार?

Patil_p
error: Content is protected !!