वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी रिलायन्स जिओकडून नोकियाला बहुवषीय आधारावर 5-जी नेटवर्क विस्तारासाठी ऑर्डर मिळाली आहे. नोकियाने ही माहिती सोमवारी दिली असून या नव्या करारांतर्गत भारतीय दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओ ही जगामध्ये सर्वाधिक मोठी 5-जी नेटवर्क प्रणाली उभारणार आहे.
या कंत्राटांतर्गत नोकिया आगामी काळात 5-जी नेटवर्कसाठी आवश्यक असणारी बरीचशी प्रणाली व साहित्य जिओला देणार आहे. स्थानक उभारणीपासून उच्च क्षमतेचा वेग प्राप्त करण्यासाठीचे अँटिना व इतर नेटवर्क विस्तारासाठीच्या यंत्रणा पुरविल्या जाणार आहेत. या प्रणालीच्या माध्यमातून रिलायन्स जिओ आगामी काळामध्ये आपल्या ग्राहकांना वेगवान 5-जी सेवा उपलब्ध करू शकणार आहे.
बहुवर्षाच्या कालावधीसाठी हा करार दोन्ही कंपन्यांमध्ये करण्यात आला असल्याची माहिती आहे. रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी सांगितले, की ताज्या आधुनिक तंत्रज्ञानाचे जाळे पसरविण्यासाठी रिलायन्स जिओचा प्रयत्न असणार असून यासाठी आवश्यक ती गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जात आहे.
नोकियाबरोबरची ही भागीदारी 5-जी नेटवर्कच्या सेवेसाठी जागतिक स्तरावरती लाभदायक ठरेल, असा विश्वासही आकाश अंबानी यांनी व्यक्त केला.