सी 31 फोन बाजारात ः 10 हजारपर्यंत किमत : ट्रिपल कॅमेराची सोय
वृत्तसंस्था / कोलकाता
मोबाइल फोन निर्माती कंपनी नोकियाने सी 31 स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. 3जीबी रॅमसह 32 जीबी पर्यंतची स्टोरेजची व्यवस्था या फोनमध्ये करण्यात आली असून या फोनला 6.7 इंचाचा एचडी डिस्प्ले असेल. फोटोग्राफीची आवड असणाऱयांसाठी यामध्ये ट्रिपल कॅमेराची सोय केली आहे.
या स्मार्टफोनची सुरुवातीची किमत 9 हजार 999 रुपये इतकी असणार असल्याचे नोकियाने म्हटले आहे. सदरचा फोन हा दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी रॅमची किंमत ही 9हजार 999 रुपये असणार असून 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज फोनची किंमत 10 हजार 999 रुपये असणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कॅमेरा आणि बॅटरी
स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. 2 मेगापिक्सल व 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसरदेखील याला असून सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 5 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 5050 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीदेखील या फोनला असणार असून फोन एकदा चार्ज केल्यानंतर तीन दिवसापर्यंत त्याची बॅटरी चांगली राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर
बॅटरीचा बॅकअप वाढवण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजंट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचेही नोकियाकडून सांगण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी म्हणून फेस अनलॉक आणि फिंगरपिंट सेंसर यासारख्या सुविधादेखील दिल्या गेल्या आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, 3.5 एम एम हेडफोन जॅक, वायफाय, मायक्रो यूएसबी पोर्ट, जीपीएस, ए-जीपीएस आणि एलटीई सपोर्टची व्यवस्था यात असेल. 4जी कनेक्टिव्हिटीसह फोन उपलब्ध होणार आहे.
या 4 रंगात येणार फोन
चारकोल, मिंट आणि सियान या रंगांमध्ये हा स्मार्टफोन येणार आहे. सदरच्या फोनची विक्री कधी करण्यात येणार आहे, याबाबत मात्र स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.