नितीश कुमार यांच्या पक्षाचा निर्णय
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने गुजरात निवडणुकीत अनेक उमेदवार उभे केले आहेत. नितिश कुमार यांनी यंदा अहमदाबादच्या बापूनगर मतदारसंघात 2002 च्या गुजरात दंगलीतील साक्षीदाराला उमेदवारी दिली आहे. संजदने या मतदारसंघात 45 वर्षीय इम्तियाज खान पठाण यांना तिकीट दिले आहे. 2002 च्या गुलमर्ग सोसायटी दंगलीप्रकरणी इम्तियाज हे महत्त्वाचे साक्षीदार आहेत. यापूर्वी 2019 साली इम्तियाज यांनी अपना देश पक्षाच्या वतीने खेडा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढविली होती.
संजद उमेदवार इम्तियाज पठाण यांनी निवडणूक आयोगाला सोपविलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता 96 हजार रुपयांची आहे. त्यांच्याकडे एक दुचाकी वाहन असून त्याची किंमत 56 हजार रुपये आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतः मजूर असल्याचे नमूद केले आहे. इम्तियाज यांनी यापूर्वी असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षात प्रवश केला होता. परंतु उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.
गुजरातच्या गोध्रा येथे 27 फेब्रुवारी 2002 रोजी कारसेवकांना जिवंत जाळण्यात आल्यावर राज्यभरात दंगली भडकल्या होत्या. दंगलींमध्ये अहमदाबादच्या मेघानीनगर येथील गुलबर्ग सोसायटीत अनेकांची हत्या झाली होती. 28 फेब्रुवारी 2002 रोजी गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत 69 जणांचा मृत्यू झाला होता. गुलबर्ग सोसायटी प्रकरणात एकूण 72 जणांच्या विरोधात खटला चालला. यातील 6 आरोपींचा मृत्यू झाला आहे. तर 38 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. जून 2016 मध्ये 24 दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.