जांबोटी ग्रा.पं.पदाधिकाऱयांचे ता.पं. समोर आंदोलन : आंदोलन मागे घेण्याची भाजप पदाधिकाऱयांची विनंती केली मान्य
प्रतिनिधी /खानापूर
जांबोटी ग्राम पंचायतीचे पीडीओ नागाप्पा बन्नी यांच्या बदलीसाठी जांबोटी ग्रा.पं. अध्यक्षा, उपाध्यक्षांसह सर्व सदस्य तसेच महिलांनी बुधवारी तालुका पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी तालुका भाजपच्या पदाधिकाऱयांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन वरिष्ठ पातळीवरून आम्ही निश्चित पीडीओची बदली करू, असे आश्वासन दिले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
या विनंतीला मान देऊन जांबोटी ग्रामपंचायत सदस्यानी आंदोलन स्थगित केले. यावेळी सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला असहकार्याची भूमिका जाहीर केली आहे. जोपर्यंत बदली होणार नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतीला कोणतेच सहकार्य करणार नाही.
जांबोटी ग्रा.पं. पीडीओ नागाप्पा बन्नी यांच्या बदलीसाठी गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन करण्यात येत होते. बुधवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. या आंदोलनात जांबोटी येथील महिलांचा मोठा सहभाग झाल्याने आंदोलन तीव्र झाले होते. यावेळी तालुका भाजपच्या पदाधिकाऱयांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्वांशी चर्चा केली.
यावेळी कोणत्याही परिस्थितीत आम्ही पीडीओ बन्नी यांना स्वीकारणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे आंदोलन लांबणार होते. याचा विचार करून तालुका भाजप पदाधिकाऱयांनी वरिष्ठांपर्यंत दूरध्वनीद्वारे चर्चा केली. येत्या काही दिवसात निश्चित बदली करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली.
तालुक्याबाहेर बदलीचे आश्वासन
यावेळी भाजपचे विठ्ठल हलगेकर, तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जि. पं. माजी सदस्य लक्ष्मण बामणे यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विठ्ठल हलगेकर म्हणाले, राज्यात भाजपची सत्ता असल्याने पीडीओच्या बदलीसाठी एवढे मोठे आंदोलन करणे गरजेचे नव्हते. आम्ही तुमच्या पाठिशी असून कोणत्याही परिस्थितीत बन्नी यांची बदली तालुक्याबाहेर करू.
प्रमोद कोचेरी म्हणाले, जिल्हा पातळीवरील नेत्यांशी आजच चर्चा करून बदली लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. संजय कुबल म्हणाले, जांबोटी पंचायतीचे कामकाज आजपर्यंत सर्वांनाच माहीत आहे. कोणतीच तक्रार आजपर्यंत आली नव्हती. मात्र, वादग्रस्त पीडीओमुळे जांबोटी ग्रा.पं.चा विकास खुंटला आहे. यासाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवून आधी बदली करून विकासाला चालना देऊ,
भाजप पदाधिकाऱयांनी जांबोटी ग्रा.पं. सदस्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन जिल्हा पंचायतीचे मुख्य सचिव दर्शन यांची भेट घेतली व बदलीसंदर्भात चर्चा केली. यावेळी दर्शन यांनी, काही दिवस बन्नी यांची बदली करता येणार नाही. तरी आपण सहकार्य करावे, असे सांगितले.