Tarun Bharat

जमीन घोटाळाप्रकरणी बेतीच्या नूर फैजल सुलेमान भाटकरला अटक

आतापर्यंत 17 जणांना अटक : अनेकांकडून मंत्र्यांची पायधरणी,बार्देश मामलेदारावर कारवाई नाही

प्रतिनिधी /पणजी

गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात काल शुक्रवारी बेती-बार्देश येथील नूर फैजल सुलेमान भाटकर याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात भादंसंच्या 465, 466, 467, 468, 471, 419, 420 कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. तक्रार क्रमांक 64/22चे तपास काम करीत असताना या नूरचा सहभाग असल्याचे आढळून आल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे. आज शनिवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.

आसगाव येथील सर्वे क्रमांक 504/10 या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून नूरने ती जमीन आपल्या नावे केली. नंतर त्यापैकी काही भाग विकल्याचेही उघड झाले आहे.

आतापर्यंत 17 जणांना अटक

एसआयटीने शंबराहून अधिक तक्रारींची नोंद केली आहे. त्यापैकी सुमारे 40 तक्रारींचे तपासकाम सुरु असून आतापर्यंत 17 संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये तीन संशयित सरकारी कर्मचारी आहेत. 14 संशयितांची सशर्थ जमिनावर सुटका झाली आहे. काही संशयितांचा एका पेक्षा अधिक तक्रारीत सहभाग असल्याचे आढळून आले असल्याने त्या संशयितांची जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा अटक करण्यात आली आहे.

अनेकांकडून मंत्र्यांची पायधरणी

राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात एसआयटी कसून तपास करीत आहे. कोटय़वधी रुपयांचा हा घोटाळा असून यात अनेक लोकांचे हात काळे झाल्याचे दिसून येत आहेत. काही बडय़ा हस्तींनी आपल्या बचावासाठी मंत्र्यांचे पाय धरणेही सुरु केले आहे. काही सरकारी कर्मचारी आपली नोकरी वाचविण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येत आहे.

बार्देश मामलेदारावर कारवाई नाही

बादेर्श तालुक्यातील मामलेदार राहूल देसाई यांच्या विरोधातही एसआयटीने तक्रार नोंद केली आहे. मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. आजही ते मामलेदार पदावर काम करीत आहेत. त्यांच्या चालकाविरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याला त्वरित अटक करण्यात आली होती. याबाबत पोलीस अधिक तपास करीत असून गरज पडल्यास मामलेदार राहूल देसाई यांना अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

पर्वरीत कडकडीत बंद

tarunbharat

खासगी कंपन्यांनी नोकर भरतीची जाहिरात द्यावी

Amit Kulkarni

ट्राय गोवाची 300 किलोमीटर राईड 36 सायकलिस्टने केली पूर्ण

Patil_p

‘ब’ गट नाटय़ समीक्षण ‘राजकारण’ नेटके सादरीकरण

Amit Kulkarni

यंदाच्या पावसाळय़ातही खड्डेमय प्रवास !

Patil_p

राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस

Amit Kulkarni