ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर कोरियाने (North Korea) एक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन (lockdown) करण्याची घोषणा किम जोंग उन (Kim Jong-un) यांनी केली आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी प्रथमच उत्तर कोरियात कोरोना बाधित आढळून आला आहे. या पहिल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर किम जोंग उन यांनी गुरुवारपासून देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किम जोंग उन यांनी प्रशासनाला कोविड-१९ (covid19) प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उत्तर कोरियात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण उत्तर कोरियात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना आणि खबरदारी घेतली जात आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी प्योंगयांगमध्ये काही नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. यामध्ये एका व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं आढळून आलं. या रुग्णाला तात्काळ विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं असून त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले आहेत.
रिपोर्टनुसार, प्योंगयांगमधील काही लोक ओमायक्रॉनच्या संपर्कात आले होते. यावेळी लोकांची नेमकी संख्या किंवा कोणत्या माध्यमातून त्यांना संसर्ग झाला याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. ८ मे रोजी संसर्ग झालेल्या लोकांचे नमुने गोळा करण्यात आले होते.
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग यांनी कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यानंतर बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. किम जोंग यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात कडक लॉकडाउन लावण्याचे आदेश दिले आहेत. तसंच राखीव वैद्यकीय पुरवठा एकत्रित करण्यास सांगितलं असल्याचं वृत्त KCNA ने दिलं आहे.