मनसेचे नेते अमेय खोपकर यांचा इशारा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावसह संपूर्ण सीमाभागात ‘बॉईज-3’ हा चित्रपट कन्नड संघटनांच्या दबावामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटातील एखाद्या संवादाविषयी आक्षेप असल्यास तो सेन्सॉर बोर्डकडे मांडावा. परंतु मराठी चित्रपटांना वेठीस धरल्यास पुढील काळात एकही कन्नड चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसे चित्रपट संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
‘बॉईज-3’ या मराठी चित्रपटात बेळगावविषयीचा ‘मराठीचा माज बेळगावमध्ये नाही तर आणि कुठे दाखविणार?’ असा संवाद आहे. हा संवाद काही कन्नड संघटनांना झोंबला. त्यामुळेच त्यांनी हा चित्रपट बेळगावमध्ये प्रदर्शित होऊ नये अशा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्तांना दिले होते. एरव्ही या ना त्या कारणाने मराठीला दडपण्यासाठी अग्रेसर असणाऱया पोलिसांनी तत्परतेने चित्रपट कोणत्याही सिनेमागृहात लागणार नाही, याची व्यवस्था केली. त्यामुळे चांगला चित्रपट असतानाही तो बेळगावमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही.
चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी या घडलेल्या प्रकाराबद्दल सडेतोड उत्तर एका व्हिडिओतून दिले. आता मनसे चित्रपट संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी धुडगूस घालणाऱया कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ देण्यास अडथळा निर्माण केल्यास मनसे स्टाईल इंगा दाखविण्याचा इशारा दिला आहे. अनेक कन्नड चित्रपट सांगली, मिरज, कोल्हापूर, लातूर, सातारा, पुणे, मुंबई येथे प्रदर्शित होतात. त्यामुळे यापुढे एकही कन्नड चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी ताकीद त्यांनी दिली आहे.