मुंबई / वृत्तसंस्था
चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने शनिवारी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा नेतृत्वाची कवचकुंडले राजीखुशीने स्वीकारली आहेत. आश्चर्य म्हणजे यंदाच्या आयपीएलला दोनच दिवस बाकी असताना धोनीने नेतृत्व सोडले आणि ही धुरा जडेजाकडे सोपवली गेली होती. पण, चेन्नईची पहिल्या टप्प्यात दाणादाण उडाल्यानंतर जडेजाने स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदावरुन पायउतार होणे पसंत केले आणि यानंतर पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा मावळता कर्णधार धोनीकडेच आली!
‘’रविंद्र जडेजाने नेतृत्वाचा राजीनामा दिला आणि महेंद्रसिंग धोनीला ही धुरा सांभाळण्याची विनंती केली. धोनीने संघहित समोर ठेवून त्याच्या विनंतीला मान्य दिला. उर्वरित हंगामात धोनीकडे नेतृत्व असेल’, असे चेन्नई सुपरकिंग्सने शनिवारी जाहीर केले.
आयपीएल इतिहासात 4 वेळा चॅम्पियन्स ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सची यंदा अतिशय खराब कामगिरी झाली असून त्यांना आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात केवळ दोन विजय मिळवता आले आहेत. दहा संघांच्या गुणतालिकेत ते सध्या नवव्या स्थानी फेकले गेले आहेत. नेतृत्वाची धुरा सांभाळताना जडेजाच्या खेळावर या जबाबदारीचा विपरीत परिणाम दिसून आला. जडेजाला यादरम्यान 8 डावात 112 धावा करता आल्या आणि केवळ 5 बळी घेता आले.