आप आमदार नोटांची बंडल्स घेऊन सभागृहात ः ‘माफियाराज’चा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांनी बुधवारी दिल्ली विधानसभेत नोटांची बंडले दाखवत खळबळ उडवून दिली. ही लाचेची रक्कम असल्याचा दावा त्यांनी केला. वैद्यकीय क्षेत्रातील भरती आणि नियुक्त्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात पैशांची देव-घेव सुरू असल्याचे सांगत त्यांनी यामध्ये मोठे माफियाराज असल्याचे स्पष्ट केले.
आम आदमी पक्षाच्या आमदाराने बुधवारी दिल्ली विधानसभेत नोटांची बंडले दाखवली. आपल्यालाही लाचेखातर मोठी रक्कम देण्यात आल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. याप्रसंगी दिल्लीतील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये माफिया पैसे घेऊन नोकऱया देत असल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे. मला गप्प बसवण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाला असून हा मुद्दा आपण एलजी व्ही. के. सक्सेना यांच्याकडेही उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.
गोयल आपल्या बॅगेत 15 लाखांच्या नोटांचे बंडल घेऊन विधानसभेत पोहोचले. भाषणादरम्यान त्यांनी बॅगेतून नोटा काढून टेबलावर ठेवल्या. त्यानंतर हातात नोटांचे बंडल दाखवत ‘हे टोकन मनी असून ते मला लाच म्हणून दिले होते’ असे त्यांनी सांगितले. मी जीव धोक्मयात घालून हे काम करत आहे. लाच देणारे इतके दबंग आहेत की माझ्याकडूनही चूक होऊ शकते. मला गप्प बसण्यासाठी ही लाच देण्यात आली असून आता मला धोका संभवू शकतो, असे त्यांनी भर सभागृहात सांगितले.
गोयल यांनी मांडलेली कैफियत
गोयल यांनी आंबेडकर रुग्णालयातील भरतीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आहे. येथे ज्या लोकांना नियमानुसार नोकऱया द्यायला हव्यात, त्या दिल्या जात नाहीत. येथील नर्सिंग व इतर पदांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. सरकारच्या नियमानुसार 80 टक्के भरती जुन्या कर्मचाऱयांची असायला हवी, पण तसे होताना दिसत नाही. काम मिळालेल्या कर्मचाऱयांच्या पगारातून कंत्राटदार आपला हिस्सा घेतात. माफिया व कंत्राटदार सेटींगच्या माध्यमातून पैसे घेऊन कामे देत आहेत. यासंबंधी ठिकठिकाणी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे गोयल यांनी सांगितले.