Tarun Bharat

पशुसंवर्धन, कृषी विभागावर ताशेरे

Advertisements

नियोजन समिती सभेत पालकमंत्र्यांनी घेतले अधिकाऱयांना फैलावर

प्रतिनिधी/ सातारा

अडीच वर्षानंतर सरकार बदलल्यानंतर प्रथमच पालकमंत्री झाल्यानंतर शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची सभा पार पडली. या सभेत बरेच काही बंद दाराआड झाले. परंतु बाहेर पत्रकारांना मात्र खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दरम्यान, नियोजन समितीत विरोधात बोलण्यासाठी कोणतेही विरोधी गटाचे आमदार नव्हते. राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील हे एकमेव होते. खासदार उदयनराजे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह आमदार शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, महेश शिंदे यांनीच बहुतांशी सर्वच विभागाचा आढावा घेतला. तब्बल पावणे दोन तासाची चर्चेचे गुऱहाळ चालले होते. या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासकरुन लम्पी व कृषी विभागाला फैलावर घेतल्याची चर्चा सुरु होती.

जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु होण्यापूर्वी शासकीय विश्रामगृहावर भाजपाचे आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे यांच्याबरोबर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार महेश शिंदे, आणि खासदार उदयनराजे यांच्यामध्ये नियोजन समितीच्या सभेच्या अनुषंगाने चर्चा झाली. आणि एकाच गाडीत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे आणि आमदार जयकुमार गोरे हे तर मंत्री शंभूराज हे त्यांच्या गाडीत त्यानंतर खासदार उदयनराजेंची गाडी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडय़ा असे नियोजन भवनात बैठकीला पोहोचले. आतमध्ये जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गोडा यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. सुरुवातीपासूनच आतमध्ये आढाव्या दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या दोन्ही खात्यांना चांगलेच कोंडीत पकडले. नेमके शेतकऱयांना पाठबळ देता काय?, लसीकरण प्रॉपरली गावात होतेय काय?, कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी सुनावले. तसेच कृषी विभागाच्या प्रमुखांना शेतीचे जे जे नुकसान होत आहे त्या शेतकऱयांचे पंचनामे करुन मदत कशी मिळे यादृष्टीने कार्यवाही होत नाही, प्रत्यक्ष आपल्या विभागाकडून कामे होऊ द्या, अशाही सूचना दिल्या. दरम्यान, जिल्हा परिषद, बांधकाम इतर विभागाचा आढावा घेण्यात आला.

प्रवेशद्वाराजवळ झाडांची कुंडी तर पाठीमागे स्वच्छतागृहजवळ पोलिसांचा बंदोबस्त

नियोजन समितीमध्ये अनेक गुपिते असतात. त्यामुळे आतमध्ये कोणाला प्रवेश नसतो. तरीही कोणी आतमध्ये जावू नये याकरता कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वतः पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे नियोजन समितीच्या प्रवेशद्वाराजवळ बंदोबस्ताला होते. तर पाठीमागच्या दाराला तब्बल आठ पोलीस होते. तेथे नजिकच स्वच्छतागृह आहे. त्याची दयनिय अवस्था असून तेथेच पोलिसांना उभे रहावे लागले.

पत्रकारांच्या प्रश्नांना शासकीय उत्तर

पालकमंत्री शंभूराज देसाई हे किमान पत्रकारांना सवलत देतील असे वाटले होते. परंतु तसे काही झाले नाही. याबाबत पत्रकारांनी विचारले. काही पत्रकारांनी तर मोजक्याच पत्रकारांना परवानगी द्या, अशी विनंती केली. परंतु मंत्री देसाई यांनी शासकीय भाषेत उत्तर दिले. इतर जिह्यात माहिती घेतली कुठेही पत्रकारांना अलाऊड नाही, त्यामुळे मीही येथे प्रवेश दिलेला नाही, असे सांगितले.

खासदार उदयनराजेंच्या हजेरीमुळे सभा उशिरापर्यंत गाजली

खासदार उदयनराजे हे तसे नियोजन सभेला सहसा गेल्याचे ऐकिवात नाही. परंतु या सभेला त्यांनी आर्वजून हजेरी लावली होती. त्यांनी अनेक मुद्दे मांडले. तिन्ही खासदारांच्या गुजगुज गोष्टी हसतहसत झाल्या. खासदार उदयनराजेंच्यामुळेच सभा उशिरापर्यंत चालली अशीही चर्चा सुरु होती.

शिवतीर्थ आणि अजिंक्यताऱयाच्या रस्त्याचा प्रश्न सभेत

जिल्हा नियोजन समितीमध्ये शिवतीर्थ आणि अजिंक्यताऱयाचा प्रश्न खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला. आमदार शिवेंद्रराजेंनीच स्वतः पत्रकारांना किल्ले अजिंक्यताऱयाचा रस्ता हा आता पालिकेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यास मंजूरी देण्यात आली असून लवकरच कामाला मंजूरी मिळेल असे सागितले तर दरम्यान शिवतीर्थासाठी निधी मंजूर झाला आहे. कामाला प्रारंभ होईल असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

शिवसेनेसह, भाजपाचे पदाधिकारीही बाहेरच ताटकळले

शिवसेनेचे पदाधिकारी रणजितसिंह, महिला आघाडीच्या शारदाताई जाधव यांच्यासह भाजपाचे जिह्यातून आलेले कार्यकर्ते नेत्यांच्या भेटीकरता आले होते. त्यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. परंतु त्यांच्या भेटीसाठी तब्बल दोन तासाहून अधिक काळ बाहेरच थांबावे लागले. एक अतर अधिकारी सभा संपल्यावर पोहोचले.

Related Stories

सज्जनगडच्या बुरुज तटबंदीची मावळ्यांकडून स्वच्छता

Patil_p

सदरबजार उर्दू शाळा क्र 12 ने मानले जिल्हाधिकायांचे आभार

Patil_p

शर्यतीच्या बैलाची अज्ञातांकडून हत्या

datta jadhav

सातारा : जनता दरबारात 61 तक्रारींचा जागीच फैसला

Archana Banage

सोमजाईनगर येथे युवतीची छेड काढल्यावरून दोन गटात राडा

Archana Banage

सार्वजनिक निर्बंध सैल…वैयक्तिक निर्बंध गरजेचे

datta jadhav
error: Content is protected !!