दि. 2 मे रोजी उत्तर सादर करण्याचा आदेश
प्रतिनिधी /पणजी
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोलवा येथे मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू झाले. परंतु या कामात अडथळे निर्माण करून काम बंद ठेवण्याचा आदेश जारी केल्याप्रकरणी काण्णा बाणावलीच्या सरपंच वेन्सीला फ्ढर्नांडिस यांच्या विरुध्द उच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमानाची नोटीस बजावली असून दि. 2 मे रोजी न्यायालयात हजर राहून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.
कोलवा येथे मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पात सांडपाणी शुध्द करून ते परत साळ नदीत सोडले जाणार आहे. सदर पाणी साळ नदीत सोडण्यास हरकत घेऊन स्थानिकांसोबत सरपंचानी जलवाहिनी टाकण्याचे काम बंद पाडले आहे.
सदर पाणी नदीत सोडल्यास नदीत आणखीन प्रदूषण वाढेल. त्या ऐवजी ते पाणी शेती अथवा बागायतीसाठी वापरण्यात यावे असे नमुद करून जुझे मारिओ फ्ढर्नांडिस व 18 जणांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे.
या याचिकेच्या सुनावणीवेळी स्थानिक आमदार आणि सरपंचाचा विरोध असल्याचे उघड झाले. कायदा हातात घेउढन काम बंद पाडल्याची माहिती सरकारी वकीलांनी न्यायालयाला दिली.
प्रकल्पाचे काम जवळ जवळ पूर्ण होत आले असून सरपंचाच्या आदेशामुळे काम रखडल्याची माहिती न्यायपीठाला देण्यात आली. याची दखल घेऊन दि. 19 एप्रिल रोजी सरपंचानी काम बंद ठेवण्याचा जारी केलेल्या आदेशावर न्यायपीठाने स्थगिती दिली. तसेच सरपंचाना न्यायालयीन अवमानाची नोटीस जारी करून सुनावणी दि. 2 मे रोजी ठेवली आहे. प्रकल्पाच्या कामाची स्थिती अहवालाद्वारे उच्च न्यायालयाला 20 जून 2022 पर्यंत सादर करावी, असे या आदेशत म्हटले आहे.